कुरंगवडी येथे धान्य भरडण्याच्या मशीनमध्ये स्कार्फ अडकल्याने एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. 21 फेब्रुवारी) सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत राजगड पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, शुभांगी निलेश राउत (वय 41, रा. कुरंगवडी ता. भोर जि. पुणे) या सकाळी सुमारे 10.30 वाजण्याच्या सुमारास गावातील शेतामध्ये ट्रॅक्टरला जोडलेल्या धान्य भरडण्याच्या मशीनजवळ काम करत होत्या. यावेळी त्यांच्या डोक्याला बांधलेला स्कार्फ अचानक मशीनमध्ये अडकला. मशीन सुरू अवस्थेत असल्याने त्या त्यात ओढल्या गेल्या व गंभीर जखमी झाल्या.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईक जयेंद्र सुरेश राउत तसेच गावातील नागरिक संतोष कुंडलीक शिळीमकर, संतोष सर्जेराव शिळीमकर आणि ट्रॅक्टर चालक जगन्नाथ रघुनाथ कांटे यांनी तत्काळ धाव घेऊन त्यांना मशीनमधून बाहेर काढले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने खाजगी वाहनाने नसरापूर येथील सिद्धीविनायक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना दुपारी 12.03 वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृत्यूबाबत कोणावरही संशय नसल्याचे नातेवाईकांनी नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार निंबाळकर करीत असून दाखल अंमलदार म्हणून पोलीस हवालदार प्रधान यांनी काम पाहिले. प्रकरणाचा तपास प्रभारी पोलीस निरीक्षक गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.










