नसरापूर (ता. भोर), प्रतिनिधी : पर्यावरणपूरक शेतीला चालना देत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उद्योजकतेच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळ व शंकरराव भेलके महाविद्यालय, नसरापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक दिवसीय बांबू कलम व लागवड’ कार्यशाळा शुक्रवार, दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहात पार पडली. या कार्यशाळेला विद्यार्थी, प्राध्यापक व कृषी विषयात रस असलेल्या नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यशाळेचे उद्घाटन विद्यार्थी विकास मंडळाच्या संचालिका डॉ. सविता कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनपर भाषणात त्यांनी विद्यापीठामार्फत विविध महाविद्यालयांत राबविण्यात येणाऱ्या विद्यार्थी-केंद्रित उपक्रमांचा आढावा घेत बांबू लागवड विषयक कार्यशाळा हा काळानुरूप व अभिनव उपक्रम असल्याचे सांगितले. भौगोलिकदृष्ट्या भोर तालुका बांबू लागवडीस अनुकूल असल्याने येथील शेतकरी व युवकांनी या क्षेत्राकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. बांबू शेतीमुळे पर्यावरण संवर्धनासह आर्थिक उन्नती साध्य होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
द्वितीय सत्रात बांबू वनस्पतीवर संशोधन करणारे तसेच राज्य शासनाच्या बांबू धोरणाचे सल्लागार डॉ. पी. तेताली यांनी भारतातील बांबूच्या विविध प्रजाती, त्याचे पर्यावरणीय महत्त्व, शास्त्रीय लागवड पद्धती, संगोपन व उत्पादन व्यवस्थापन यावर सखोल मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या बॉटनिकल गार्डनमधील बांबू बेट परिसरात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे कलम प्रक्रिया, वाढीचे टप्पे व व्यवस्थापनाची माहिती देण्यात आली. भारतातील बांबूला त्यांनी ‘गवती वनस्पतीतील कोहिनूर’ अशी उपमा देत त्याचे आर्थिक व पर्यावरणीय मूल्य अधोरेखित केले.
तृतीय सत्रात भोर तालुक्यातील गुणवरे येथे उभारण्यात आलेल्या ‘द बांबू सेतू’ प्रकल्पाची माहिती श्रीमती अनुराधा काशीद यांनी सादर केली. प्रारंभी ४० एकरांपैकी १० एकर क्षेत्रावर लागवड करून प्रकल्पाची यशस्वी उभारणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आज हा प्रकल्प प्रशिक्षण, पर्यटन व व्यावसायिक संधींचे केंद्र बनला असून देश-विदेशातील पर्यटक व विद्यार्थी येथे अभ्यासासाठी भेट देतात. बांबू शेतीची आर्थिक व्यवहार्यता, बाजारपेठ व उत्पादन व्यवस्थापनाबाबत विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी सविस्तर उत्तरे दिली.
याच सत्रात श्री. राहुल काशीद यांनी बांबूपासून तयार होणाऱ्या पर्यावरणपूरक व टिकाऊ वस्तूंची माहिती देत उत्पादन प्रक्रिया, विपणन आणि विक्री व्यवस्थेचे महत्त्व स्पष्ट केले. बदलत्या दृष्टिकोनातून पाहिल्यास बांबू उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीची क्षमता असल्याचे त्यांनी नमूद केले.
चतुर्थ सत्रात डॉ. पी. तेताली यांनी शास्त्रीय पद्धतीने बांबू लागवडीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले. लागवडीसाठी खड्ड्याचे योग्य माप, खत व्यवस्थापन, बुरशीनाशक व कीटकनाशकांचा वापर, छाटणी पद्धती आणि दीर्घकालीन संगोपन याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार शितोळे होते. ग्रामीण भागात बांबू लागवडीबाबत जागरूकता निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे सांगत पर्यावरणपूरक उद्योजकतेसाठी बांबू शेती प्रभावी पर्याय ठरू शकते, असे त्यांनी प्रतिपादन केले.
कार्यशाळेचे नियोजन विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी डॉ. एस. जी. घाडगे यांनी केले. सैद्धांतिक शिक्षणाबरोबर प्रत्यक्ष अनुभवाधारित शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये कौशल्यविकासाला चालना मिळते, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्था पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच स्वयंसेवकांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक शेती, बांबू उद्योग व स्वावलंबनाच्या संधींबाबत नव्याने जागरूकता निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.










