भोर : तालुक्यातील कुरंगवडी येथे शेतातील काम करताना मळणी यंत्रात अडकून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा ठपका ठेवत ट्रॅक्टर चालकाविरुद्ध राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 21 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास कुरंगवडी गावच्या हद्दीत वाटाण्याच्या पिकाची मळणी सुरू होती. यावेळी ट्रॅक्टरला जोडलेल्या मळणी यंत्रावर काम करत असताना शुभांगी निलेश राऊत (वय 42, रा. कुरंगवडी) यांचा स्कार्फ ट्रॅक्टरच्या जॉईंटमध्ये अडकला.
या घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. तपासादरम्यान संबंधित मळणी यंत्रावर आवश्यक सुरक्षा कवच नसल्याचे तसेच ट्रॅक्टर चालक जनार्दन उर्फ सुनिल रघुनाथ काटे याने निष्काळजीपणे यंत्र चालविल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. तपास पोलीस हवालदार मदने करीत असून पोलीस निरीक्षक गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात येत आहे.







