भोर ( नसरापूर प्रतिनिधी) – विलास धोंगडे
भोर तालुक्यातील सत्ताधारी पक्षातील काही नेतेमंडळींनी सत्तेचा गैरवापर करून जिल्हा परिषदेच्या गटरचनेत अनियमित फेरफार केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे युवा नेते मा. गणेशभैय्या खुटवड यांनी केला आहे. प्रशासनाने गटरचना करताना नैसर्गिक भौगोलिक सीमारेषांचा – विशेषतः नद्या व ओढ्यांचा – विचार न करता मनमानी पद्धतीने गावांची अदलाबदल केली असल्याचे त्यांनी सांगितले.
मा. खुटवड यांनी माहिती दिली की “कामथडी-भोंगवली” गटातील गुंजवणी नदीच्या पलीकडील हातवे बु., हातवे खुर्द व तांभाड ही गावे चुकीच्या पद्धतीने “वेळू-नसरापूर” गटात समाविष्ट करण्यात आली आहेत. तसेच “वेळू-नसरापूर” गटातील उंबरे, कामथडी व करंदी खेबा ही गावे उलट “कामथडी-भोंगवली” गटात घेण्यात आली आहेत. ही कृती सत्ताधारी पक्षातील काही नेतेमंडळींच्या राजकीय दबावाखाली झाल्याचा आरोप त्यांनी केला.
खुटवड यांनी स्पष्ट केले की, “या अन्याय्य गटरचनेनंतरही आपण आपले राजकीय कार्यक्षेत्र असलेल्या वेळू-नसरापूर गटातूनच जिल्हा परिषद निवडणूक लढवणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या पक्षाकडूनच ही निवडणूक लढवण्याचा ठाम निर्णय घेतला आहे.”
सन २०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत स्वतःच्या पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली असतानाही आपण पक्षनिष्ठा राखली. मागील आठ वर्षांपासून युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून कार्य करताना पक्षाची विचारधारा व विकासाभिमुख धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी केले. त्याचबरोबर वेळू-नसरापूर गटातील सर्व गावांत विविध सामाजिक व विकासात्मक उपक्रम राबवले. खासदार सौ. सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या अनेक मागण्यांचे समाधान केले.
उंबरे ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून कार्य करताना सुमारे चार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकासकामांची यशस्वी अंमलबजावणी केली असल्याचे त्यांनी नमूद केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या विभाजनानंतरही त्यांनी पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाशी निष्ठा ठेवत संघटन बांधणीसाठी सातत्याने कार्य केले.
शेवटी खुटवड म्हणाले, “गट रचनेत प्रशासनाने आमच्या तीन गावांचा समावेश दुसऱ्या गटात केला असला तरी वेळू-नसरापूर गटातील प्रत्येक गाव माझे स्वतःचे आहे. या सर्व गावांतील जनतेचा पाठिंबा व गेल्या अनेक वर्षांचे कार्य याच जोरावर मी वेळू-नसरापूर गटातूनच जिल्हा परिषद निवडणुकीत उतरतो आहे.”










