प्रतिनिधी विलास धोंगडे नसरापूर
“वीस वर्षांच्या जनसंपर्कावर विश्वास; वेळू–नसरापूरमध्ये विजय निश्चित”
“संग्रामदादांच्या मार्गदर्शनाखाली विजयाचा ध्यास” – सुके यांचा निर्धार
भोर–वेल्हा–मुळशी या त्रिसीमेतील राजकीय, सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रात गेल्या दोन दशकांपासून निष्ठेने कार्यरत असलेले राजगड साखर सहकारी साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन पोपटराव सुके यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या भूमिकेचा खुलासा करताना स्पष्ट शब्दांत सांगितले की — “संधी मिळाल्यास वेळू–नसरापूर गटात विकासाच्या बळावर आणि जनतेच्या पाठिंब्यावर दमदार लढा देणार आहे.”
सुके म्हणाले, “भोर–वेल्हा–मुळशीचे कार्यसम्राट मा. आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षांपासून मी लोकसेवा आणि विकासाच्या कामात झोकून दिले आहे. विकासाच्या दिशेने मा आमदार दादांनी उभारलेल्या पायावर आज या भागातील गावागावांत कामांची घोडदौड सुरू आहे. अशा वेळेस वेळू–नसरापूर गटातील लोकांनी दाखवलेला विश्वास माझ्या आत्मविश्वासाला अधिक बळ देणारा आहे.”
वीस वर्षांच्या जनसंपर्कावर विश्वास; वेळू–नसरापूरमध्ये विजय निश्चित
मागील निवडणुकीत वेळू–भोंगवली गटातून उमेदवारी देत सुके यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. त्या अनुभवाचा धडा घेत यावेळी ते नव्या जोमाने तयारी करत आहेत. “वीस वर्षांच्या सातत्यपूर्ण जनसंपर्कामुळे आणि गावागावांतील जनतेशी असलेल्या आत्मीय नात्यामुळे या वेळी विजय निश्चित आहे,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
त्यांनी पुढे सांगितले, “राजकारण म्हणजे फक्त निवडणूक नव्हे, तर लोकांच्या अडचणींना प्रतिसाद देणे, त्यावर तोडगा काढणे, आणि विकासाला चालना देणे. हीच माझी कार्यसंस्कृती आहे. म्हणूनच मला लोक आपलंसं समजतात. हा स्नेहच माझं बळ आहे.”
संग्रामदादांच्या मार्गदर्शनाखाली विजयाचा ध्यास – सुके यांचा निर्धार
सुके म्हणाले, “मा. आमदार संग्रामदादा थोपटे आणि भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास अमूल्य आहे. वेळू–नसरापूर गटातून पक्षाच्यावतीने लढण्याची संधी मिळेल, असा माझा विश्वास आहे. दादांच्या मार्गदर्शनाखाली विकासाच्या कामांचा ध्यास घेत मी या निवडणुकीत उतरू इच्छितो. माझ्या कार्याचा आढावा घेतल्यास प्रत्येक गावात काही ना काही बदल दिसून येईल.”
गेल्या दोन दशकांत पोपटराव सुके यांनी वेळू–नसरापूर परिसरात सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
सामाजिक आणि औद्योगिक योगदान
राजगड साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत तातडीने उपाययोजना केल्या. ऊस उत्पादकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. तसेच ‘यंत्रनिर्माण पतसंस्था’ या उपक्रमातून स्थानिक तरुणांना उद्योग उभारणीसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले. या माध्यमातून अनेक युवकांना स्वतःचा व्यवसाय उभारता आला आणि ग्रामीण भागात स्वावलंबनाची नवी दिशा मिळाली.
शैक्षणिक आणि रोजगार क्षेत्रातील पुढाकार
सुके यांच्या ‘नवसह्याद्री शिक्षण संस्था’ या उपक्रमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी मिळाली. शैक्षणिक गुणवत्तेसह रोजगाराभिमुख प्रशिक्षणावर त्यांनी भर दिला. अनेक विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत शिक्षणातून आत्मनिर्भरतेचा मार्ग खुला केला.
क्रीडा आणि युवा प्रोत्साहन
क्रीडा क्षेत्रातही त्यांनी आघाडी घेतली आहे. ग्रामीण भागातील तरुण खेळाडूंना संधी मिळावी म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. भोर–वेल्हा भागातील अनेक तरुणांनी त्यांच्या प्रोत्साहनामुळे राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावर नाव कमावले आहे.
जनतेचा विश्वास आणि सहकाऱ्यांची साथ
“आजवर जनतेचा विश्वास आणि सहकाऱ्यांची साथ मिळाल्यामुळेच मी या स्तरावर आलो आहे. या निवडणुकीतही जनतेचा कौल आपल्याकडेच राहील, याची मला पूर्ण खात्री आहे,” असे सुके यांनी शेवटी नमूद केले.
त्यांच्या वक्तव्यातील आत्मविश्वास, कार्याचा पट आणि जनतेशी असलेली जवळीक पाहता वेळू–नसरापूर गटातील आगामी निवडणुकीत त्यांची उमेदवारी निश्चितच चर्चेचा केंद्रबिंदू ठरणार आहे.
पोपटराव सुके हे नाव आता फक्त राजगड साखर कारखान्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. सामाजिक बांधिलकी, शेतकरी हितासाठी झटणारा दृष्टिकोन आणि शिक्षणासोबत उद्योगधंद्यातील प्रयोगशीलता या सर्व गुणांचा संगम त्यांच्या कार्यशैलीत दिसतो. वेळू–नसरापूर गटातील राजकारणात त्यांचा प्रभाव सतत वाढत आहे. आगामी निवडणुकीत त्यांना संधी मिळालीच, तर हा गट नव्या विकासाच्या वाटेवर झेप घेईल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांत व्यक्त होत आहे.










