पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वरदाडे येथे रिंग रोडच्या कामादरम्यान घडलेल्या दुर्घटनेत एका तरुण ऑपरेटरचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष झाल्याने ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
मृत व्यक्तीचे नाव विजय कुमार (जन्म तारीख १८ सप्टेंबर २००४) असे असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील इलाहाबाद (प्रयागराज) जिल्ह्यातील हिरामनपुर येथील रहिवासी आहे. सध्या तो पुणे येथे वास्तव्यास होता व वरदाडे येथे रिंग रोड प्रकल्पावर ऑपरेटर म्हणून कार्यरत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, कामादरम्यान क्रेनवर चढताना संबंधित तरुणाने कोणत्याही प्रकारचे सेफ्टी साधन, विशेषतः लाइफ जॅकेट किंवा इतर सुरक्षात्मक उपकरण वापरले नव्हते. याचदरम्यान शिडीवरून त्याचा पाय घसरला आणि तो थेट सुमारे ४० फूट खोल नदीपात्रातील पाण्यात कोसळला. संबंधित तरुणाला पोहता येत नसल्याने तो पाण्यातून बाहेर येऊ शकला नाही आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन, हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीम तसेच अग्निशमन दल काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकांनी तत्काळ शोध व बचाव कार्य सुरू केले.
या बचाव मोहिमेत अग्निशमन दलाचे वाहन चालक प्रेम राठोड यांच्यासह सिद्धांत जाधव, पंकज फुलाते, ज्ञानेश्वर जावळे, विकास आडे यांनी सहभाग घेतला. तसेच PDRF जवान अजय सावंत, विशाल माळी, दीपक कराड यांनीही मदतकार्य केले.
हवेली आपत्ती व्यवस्थापन पथकातील संदीप सोळसकर, संजय चोरगे पाटील, संतोष भगत, प्रतीक महामुनी, गणेश सपकाळ, उत्तम पिसाळ आणि प्रवीण तेलवडे यांनीही घटनास्थळी धाव घेत बचावकार्य राबवले.
दरम्यान, या घटनेमुळे कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. योग्य सुरक्षात्मक साधनांचा वापर केला असता ही दुर्घटना टाळता आली असती, अशी चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे. पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू असून, संबंधित ठेकेदार व जबाबदार व्यक्तींवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.










