नसरापूर प्रतिनिधी : विलास धोंगडे
भोर तालुक्यातील कामथडी गणातील पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट) तर्फे संभाव्य उमेदवार म्हणून वैशालीताई गोविंदराव गाडे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सामाजिक कार्याचा भक्कम पाया, कुटुंबाची राजकीय परंपरा आणि महिलांसाठी सातत्याने राबवलेले उपक्रम यामुळे त्यांची उमेदवारी अधिक ठळक बनत आहे.
वैशालीताई गाडे यांचे माहेर धांगवडी असून 1992 साली त्या कापुरव्होळ येथील गाडे पाटील घराण्यात आल्या. विवाहानंतर त्यांनी कुटुंबातील सामाजिक परंपरा पुढे नेण्याबरोबरच गावातील महिलांसाठी विविध कल्याणकारी उपक्रमांत पुढाकार घेतला. त्यांच्या पतींचा—गोविंदराव सोनबा गाडे—गावातील सामाजिक क्षेत्रावर भक्कम प्रभाव असून ते विर धाराऊ माता तरुण मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय कापुरव्होळ-हरिचंद्री विविध विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक म्हणूनही ते जबाबदारी सांभाळतात. त्यांच्या नेतृत्वाखाली तीन संचालक कार्यरत असून गावाच्या विकासासाठी ते सातत्याने पुढाकार घेत असतात.
गाडे कुटुंबाचे राजकारणातील योगदानही भोर तालुक्यात परिचित आहे. वैशालीताई यांचे दीर, वसंतजी सोनबा गाडे, यांनी विकास सोसायटीच्या चेअरमन पदावर कार्य करताना गावासाठी अनेक उपक्रम राबवले. कुटुंबाची ही सामाजिक-राजकीय परंपरा पुढे नेत .वैशालीताई यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला. महिला बचत गटांच्या माध्यमातून त्यांनी महिलांचे सक्षमीकरण, आर्थिक स्वावलंबन आणि विविध प्रशिक्षण उपक्रम राबवले असून ग्रामिण भागातील महिलांना आत्मविश्वास देण्याचे कार्य त्या सातत्याने करत आहेत.
कुटुंबातील तरुण पिढीतही राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय परंपरा कायम आहे. त्यांचा मुलगा राहुल गाडे 2015 पासून पक्षाच्या विविध पदांवर सक्रिय असून सध्या तो भोर तालुका राष्ट्रवादी सोशल मीडिया अध्यक्ष म्हणून कार्य पाहतो. युवकांच्या राजकारणात त्याचे योगदान आणि पक्षनिष्ठा लक्षवेधी ठरली आहे.
वैशालीताई यांनी आतापर्यंत कापुरव्होळ ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी पॅनलतर्फे दोन पंचवार्षिकांमध्ये उमेदवारी दिली आहे. ग्रामविकासासाठी त्यांनी मांडलेले मुद्दे, महिलांसाठी उपलब्ध करून दिलेल्या संधी आणि ग्रामस्थांशी संवाद यामुळे त्यांना परिसरात चांगला जनाधार मिळाल्याचे दिसते.
सध्या कामथडी गणातील पंचायत समितीच्या निवडणुकीची हवा लागली असून सर्व पक्षांत उमेदवार निवडीची चाचपणी सुरू आहे. राष्ट्रवादी (अजितदादा पवार गट) तर्फे वैशालीताई गाडे हे एक बळकट पर्याय म्हणून उदयास येत आहेत. पक्ष कार्यकर्त्यांपासून ते ग्रामस्थांपर्यंत त्यांच्या नावाला उत्सुकतेने पाठिंबा मिळत असल्याची माहिती स्थानिक पातळीवरून मिळते.
ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण, सामाजिक एकोप्याचे जतन आणि तरुणांना राजकारणात दिशा देण्याच्या भूमिकेमुळे वैशालीताई गाडे यांचे कार्य सर्वांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्या अधिकृत उमेदवार झाल्यास कामथडी गणातील पंचायतराज राजकारणात चुरस वाढण्याची शक्यता आहे.
कामथडी गणातील मतदारांच्या अपेक्षा, स्थानिक प्रश्न आणि विकासाच्या प्राधान्यक्रमावर लवकरच उमेदवारांची भूमिका अधोरेखित होत जाईल. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट) मध्ये वैशालीताई गाडे यांच्या उमेदवारीबाबत उत्सुकता आणि सकारात्मक चर्चा कायम आहे.










