आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

भोर नगरपालिकेत सत्तासमीकरण उलटले; भाजपाला संख्याबळ, पण नगराध्यक्ष राष्ट्रवादीकडे


भोर | प्रतिनिधी : तबरेज खान

भोर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा निकाल जाहीर होताच शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. २० जागांपैकी तब्बल १६ जागा जिंकत भारतीय जनता पक्षने नगरपरिषदेत संख्याबळ मिळवले असले, तरी नगराध्यक्षपदावर मात्र राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे वर्चस्व प्रस्थापित झाले. राष्ट्रवादीचे उमेदवार रामचंद्र (नाना) श्रीपती आवारे यांनी भाजपाचे संजय जगताप यांचा १७० मतांनी पराभव करत नगराध्यक्षपदावर बाजी मारली.

भोरमध्ये भाजपाचे जास्त नगरसेवक निवडून येऊनही नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे गेल्याने ‘गड आला पण सिंह गेला’ अशी राजकीय चर्चा रंगली आहे. भाजपात प्रवेश केलेले संग्राम थोपटे यांचे भोर नगरपरिषदेवरील निर्विवाद वर्चस्व या निकालामुळे टिकून राहिले नाही, हेही स्पष्ट झाले.

मतमोजणीचा थरार; अखेरच्या फेऱ्यांत चित्र पालटले

रविवार (दि. २१) रोजी सकाळी दहा वाजता कान्होजी जेधे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), भोर येथे मतमोजणीला सुरुवात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी प्राजक्ता घोरपडे व सहाय्यक निवडणूक अधिकारी गजानन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक १ ते ५ ची मतमोजणी एकाच वेळी पार पडली. पहिल्या फेरीत राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारांनी आघाडी घेतली, तर बहुतेक प्रभागांमध्ये भाजपाचे वर्चस्व दिसून आले.

नगराध्यक्षपदाच्या पहिल्या पाच फेऱ्यांमध्ये संजय जगताप यांनी २४५ मतांची आघाडी घेतली होती. मात्र प्रभाग क्रमांक ६ ते १० मधील निकाल लागल्यानंतर रामचंद्र आवारे यांनी मुसंडी मारत आघाडी उलटवली आणि अखेर १७० मतांनी विजयी होत नगराध्यक्षपद आपल्या नावावर केले. विशेष म्हणजे दोन्ही उमेदवारांना त्यांच्या-त्यांच्या प्रभागात मोठी आघाडी मिळू शकली नाही, त्यामुळे ही लढत अखेरपर्यंत अटीतटीची ठरली.

चिठ्ठीवर निकाल, विक्रम आणि पराभव

या निवडणुकीत काही ठिकाणी अत्यंत रोचक प्रसंग पाहायला मिळाले. प्रभाग क्रमांक २ मध्ये आशु सोमनाथ ढवळे व ॲड. जयश्री राजकुमार शिंदे यांना समान मते मिळाल्याने चिठ्ठी टाकून निकाल जाहीर करण्यात आला. त्यात भाजपाच्या जयश्री शिंदे यांना विजय मिळाला.

प्रभाग क्रमांक ७ मधील स्नेहल तुषार घोडेकर यांनी सर्वाधिक ४२६ मतांनी दणदणीत विजय मिळवला, तर राष्ट्रवादीच्या सुरेखा मळेकर यांनी अवघ्या २१ मतांच्या फरकाने विजय संपादन केला. माजी नगरसेवक चंद्रकांत मळेकर तसेच माजी नगरसेविकेचे पती बजरंग शिंदे यांचा या निवडणुकीत पराभव झाला.

अनुभवाचा विजय; सलग सातव्यांदा निवड

माजी उपनगराध्यक्ष जगदीश किरवे सलग सातव्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. अमित सागळे यांनी ४१५ मताधिक्याने विजय मिळवत सागळे घराण्याची परंपरा कायम राखली. पल्लवी सागळे आणि मयुरी गायकवाड यांनीही मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. सुमंत शेटे आणि स्नेहा पवार यांनाही मतदारांनी स्पष्ट कौल दिला.

राजकीय वर्तुळात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यातील ‘अघोषित लढत’ म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात होते. अखेर उपमुख्यमंत्री गटाने नगराध्यक्षासह चार नगरसेवक निवडून आणत भोर नगरपरिषदेवर ताबा मिळवला, अशी चर्चा आहे.

भोर नगरपरिषद – विजयी उमेदवार

नगराध्यक्ष :

रामचंद्र श्रीपती आवारे – राष्ट्रवादी काँग्रेस

प्रभाग क्रमांक १ :

सुरेखा मळेकर – राष्ट्रवादी काँग्रेस

अनिल भेलके – राष्ट्रवादी काँग्रेस

प्रभाग क्रमांक २ :

कुणाल धुमाळ – राष्ट्रवादी काँग्रेस

जयश्री शिंदे – भाजप (चिठ्ठीवर विजय)

प्रभाग क्रमांक ३ :

रेणुका बदक – भाजप

जगदीश किरवे – भाजप

प्रभाग क्रमांक ४ :

अमित सागळे – भाजप

तृप्ती सुपेकर – भाजप

प्रभाग क्रमांक ५ :

जयवंत शेटे – भाजप

मयुरी गायकवाड – भाजप

प्रभाग क्रमांक ६ :

मनिषा पवार – भाजप

कुणाल पलंगे – भाजप

प्रभाग क्रमांक ७ :

गणेश मोहीते – भाजप

स्नेहल घोडेकर – भाजप

प्रभाग क्रमांक ८ :

पल्लवी सागळे – भाजप

सचिन तारू – भाजप

प्रभाग क्रमांक ९ :

केदार देशपांडे – राष्ट्रवादी काँग्रेस

मनिषा भेलके – भाजप

प्रभाग क्रमांक १० :

सुमंत शेटे – भाजप

स्नेहा पवार – भाजप


  • 👍
107
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!