आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

नसरापूर–केळवडे–साळवंडे गावभेट दौऱ्यात संदिप (काका) शिळीमकर यांना उत्स्फूर्त प्रतिसाद


नसरापूर– प्रतिनिधी विलास धोंगडे

भोर पंचायत समिती नसरापूर गणातील गावभेट दौऱ्याचा पुढील टप्पा शुक्रवार (दि. २१ नोव्हेंबर २०२५) रोजी पार पडला. नसरापूर, केळवडे आणि साळवंडे या तीनही गावांमध्ये श्री. संदिप (काका) शिळीमकर यांच्या भेटीला ग्रामस्थांनी सकारात्मक आणि उत्साही प्रतिसाद दिला. लोकसंपर्क यात्रेमध्ये शिळीमकर यांनी स्थानिक प्रश्न, विकासाची दिशा आणि पक्षनिष्ठेबाबत ग्रामस्थांशी संवाद साधला.

 

नसरापूरमध्ये झालेल्या मुख्य सभेत गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते सुधीर शेडगे, गणेश दळवी, बाबू झोरे आणि संतोष सणस यांच्या नेतृत्वात शिळीमकर यांचे स्वागत करण्यात आले. भैरवनाथ मंदिर परिसरात आयोजित बैठकीत स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गणेश दळवी यांनी बोलताना सांगितले की, “संग्राम दादा थोपटे यांच्याकडून ज्या उमेदवाराला तिकीट मिळेल, आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी उभे राहू. नसरापूरमध्ये अनेक इच्छुक आहेत, त्यात संदिप शिळीमकरही आहेत. पक्षाचा अंतिम निर्णय आम्ही मान्य करू.”

नसरापूरमधील युवकांनी शिळीमकर यांच्या दौऱ्याला उत्स्फूर्त स्वागत देत पायी रॅलीचे आयोजन केले. चेलाडी चौक येथे प्रज्योत कदम यांनी शिळीमकर यांना समर्थन दर्शविताना उमेदवारीबाबत सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली.

यानंतर काफिला केळवडे येथे दाखल झाला. येथे स्थानिक युवकांनी आणि ग्रामस्थांनी स्वागत करत उपस्थिती दर्शविली. केळवडे गावातील भाजप नेते आणि भोर तालुका भाजप उपाध्यक्ष सोनल कोंडे यांनी शिळीमकर यांच्याशी संवाद साधताना सांगितले की, “ग्रामविकासाच्या प्रश्नांमध्ये शिळीमकर यांनी सातत्याने भूमिका घेतली आहे. आम्ही स्वतः संग्राम थोपटे यांच्याकडे तिकीटाबाबत मागणी करणार आहोत.” गावकऱ्यांनीही शिळीमकरांना स्थानिक पातळीवर पाठिंबा देण्याची तयारी व्यक्त केली.

साळवडे गावातही भेटीदरम्यान ग्रामस्थ एकत्रितपणे उपस्थित होते. गावातील मंदिरापाशी सरपंच माया साहेबराव भडाळे यांच्या हस्ते शिळीमकरांचे स्वागत करण्यात आले. ग्रामस्थांनी मनोगत व्यक्त करत सांगितले की, “भाजपकडून तिकीट मिळाल्यास साळवडे गाव संपूर्ण ताकदीने शिळीमकर यांच्या पाठीशी उभे राहील.” गावातील युवकांनी आणि नागरिकांनी एकत्रित रॅली काढत शिळीमकर यांना प्रतिसाद दिला.

आजच्या दौऱ्यात तीनही गावांमध्ये शिळीमकर यांना मिळालेला प्रतिसाद पाहता नसरापूर गणातील राजकीय समीकरणांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढत असल्याचे स्पष्ट दिसून आले. स्थानिक नेतृत्व, युवकवर्ग आणि नागरिकांचा सहभाग या दौऱ्याचे वैशिष्ट्य ठरला.

दौऱ्याच्या शेवटी शिळीमकर यांनी ग्रामस्थांचे आभार मानत सांगितले की, “जनतेचा पाठिंबा ही माझी सर्वात मोठी ताकद आहे. पक्षाने दिलेला निर्णय मान्य करून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.”


  • 👍
97
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!