इंदापूर प्रतिनिधी : सागर जगदाळे
देशातील पहिल्या स्त्री शिक्षिका, कवयित्री व थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले या केवळ इतिहासातील व्यक्तिमत्त्व नसून सामाजिक परिवर्तन, धैर्य आणि मानवतेचे जिवंत प्रतीक आहेत, असे प्रतिपादन बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील प्रा. राजकुमार कदम यांनी केले. आजही स्त्री अत्याचाराच्या घटना घडत असताना महिलांनी व विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय जीवनातून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. तानाजी मगर होते. यावेळी इंग्रजी विभागप्रमुख प्रा. संदीप साठे, भूगोल विभागप्रमुख प्रा. भास्कर गटकुळ, प्रसिद्धी विभागप्रमुख डॉ. प्रशांत चवरे, अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. शाम सातर्ले, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. सारिका पाटील यांच्यासह प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
प्रा. कदम यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले की, समाजाने नाकारलेल्या स्त्रियांना माणुसकीचा आधार देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाबरोबरच करुणा आणि मानवतेचा आदर्श समाजासमोर ठेवला. विधवेच्या मुलाला दत्तक घेऊन रक्ताच्या नात्यांपेक्षा मानवतेचे नाते श्रेष्ठ असल्याचा संदेश त्यांनी कृतीतून दिला. स्त्री शिक्षणासाठी अपमान, छळ व सामाजिक बहिष्कार सहन करूनही त्यांनी आपला लढा अखंड सुरू ठेवला, हा वारसा आजच्या पिढीसाठी दीपस्तंभ आहे.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. तानाजी मगर यांनी सावित्रीबाई फुले या समता, स्वातंत्र्य आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांची मशाल घेऊन समाजाला दिशा देणाऱ्या क्रांतिकारक असल्याचे नमूद केले. शिक्षणाच्या माध्यमातून स्त्रीला आत्मनिर्भर करण्याचा त्यांचा विचार आजही तितकाच कालसुसंगत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सारिका पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. धनाजी मत्रे यांनी तर आभार प्रा. विनोद भुजबळ यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.










