भोर तालुका पंचायत समितीचे सदस्य आणि काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते श्री. सतीश दादा चव्हाण यांची भोर तालुका काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून, या निवडीबद्दल तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
टिळक भवन, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात, काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. श्री हर्षवर्धन वसंतराव सापकाळ साहेब आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) चे राष्ट्रीय सचिव मा. आमदार अमित विलासराव देशमुख साहेब यांच्या हस्ते सतीश दादा चव्हाण यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. या वेळी भोर तालुक्यातील अनेक ग्रामस्थ, ज्येष्ठ व तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सतीश दादा चव्हाण यांनी पंचायत समिती सदस्य म्हणून प्रत्येक वाडी-वस्तीपर्यंत पोहोचून जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने काम केले आहे. ग्रामीण विकास, शिक्षण, शेती आणि सहकार क्षेत्रात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. पक्षनिष्ठा, जनसेवा आणि संघटन कौशल्य या गुणांच्या आधारे त्यांना तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
भोर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी दादांच्या निवडीचे स्वागत करत, “सतीश दादांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष अधिक मजबूत होईल आणि भोर तालुक्याच्या विकासासाठी नवी दिशा मिळेल” असा विश्वास व्यक्त केला आहे.
“पक्ष हे माध्यम आहे, पण दादांनी केलेल्या कामाची खरी पावती जनता जिल्हा परिषदेला देणार आहे,” अशा शब्दांत तरुण कार्यकर्त्यांनी त्यांच्यावरील विश्वास व्यक्त केला.










