आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

ऑनलाईन फसवणुकीचा वाढता धोका; एका फोन कॉलने १० हजारांचा फटका


भोर तालुक्यातील कोळवडी येथील एका महिलेची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली असून, अनोळखी फोन कॉलवर विश्वास ठेवल्यामुळे संबंधित महिलेच्या बँक खात्यातून १० हजार रुपये गमवावे लागले आहेत. या घटनेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी डिजिटल व्यवहार करताना अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अनुराधा शाईनाथ पडवळ (रा. कोळवडी, ता. भोर, जि. पुणे) यांना दिनांक २९ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे १०:५६ वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन आला. संबंधित व्यक्तीने “तुमच्या खात्यात आमचे पैसे चुकून जमा झाले आहेत, ते परत पाठवा” असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने बनावट व्यवहाराचा स्क्रीनशॉट पाठवून पैसे परत पाठवण्यास सांगितले.

 

स्क्रीनशॉटमध्ये व्यवहार “यशस्वी” झाल्याचा मेसेज दिसत असल्याने पडवळ यांनी त्यावर विश्वास ठेवून संबंधित व्यक्तीला पैसे पाठवले. मात्र काही वेळानंतर खात्याची पडताळणी केली असता त्यांच्या खात्यातून १०,००० रुपये डेबिट झाल्याचे दिसून आले आणि खाते शून्य शिल्लक दाखवत होते. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ राजगड पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली.

 

या प्रकरणी राजगड पोलीस स्टेशनकडून ऑनलाईन फसवणूक अर्ज नोंदवून पुढील तपासासाठी सायबर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण यांच्याकडे प्रकरण वर्ग करण्यात आले आहे. संबंधित रक्कम कोणत्या बँक खात्यात जमा झाली, ती एटीएमद्वारे काढण्यात आली की अन्य मार्गाने वापरण्यात आली याचा तपास सध्या सुरू आहे.

 

पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अनोळखी फोन कॉल, मेसेज किंवा सोशल मीडियावरील लिंकवर विश्वास ठेवू नये. “चुकून पैसे आले” असे सांगून पैसे मागणाऱ्या व्यक्तींना प्रतिसाद देण्यापूर्वी स्वतःचे बँक खाते तपासावे आणि आवश्यक असल्यास संबंधित बँकेशी थेट संपर्क साधावा. कोणत्याही परिस्थितीत OTP, UPI PIN किंवा बँक खात्याची गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये.

 

ग्रामीण भागात डिजिटल व्यवहार वाढत असले तरी सायबर फसवणुकीबाबत जागरूकतेचा अभाव असल्याने अनेक नागरिक अशा प्रकारच्या गुन्ह्यांना बळी पडत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने सावधगिरी बाळगून व्यवहार करणे आवश्यक आहे. संशयास्पद कॉल आल्यास त्वरित सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३० वर संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

 

ही घटना सर्वांसाठी इशारा असून, थोडीशी जागरूकता आणि संयम ठेवला तर अशा प्रकारच्या आर्थिक फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करणे शक्य आहे.


  • 👍
97
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!