आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

रांझे येथे बेकायदेशीर देशी-विदेशी दारूच्या साठ्यावर राजगड पोलिसांची धडक कारवाई; ₹53 हजारांहून अधिक किमतीचा मद्यसाठा जप्त


भोर तालुक्यातील रांझे गावात बेकायदेशीरपणे देशी व विदेशी मद्याचा साठा करून ठेवणाऱ्यांवर राजगड पोलीस स्टेशनच्या पथकाने धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणावर मद्यसाठा जप्त केला आहे. या कारवाईत विविध ब्रँडच्या मद्याच्या शेकडो सिलबंद बाटल्या हस्तगत करण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत ₹53 हजार 475 इतकी आहे. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 जून रोजी रात्री साडेआठच्या सुमारास रांझे गावच्या हद्दीत चितळे कंपनीच्या शेजारी व अचूक कंपनीसमोरील रस्त्याच्या पलीकडे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीर मद्यसाठा असल्याची माहिती राजगड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार राजगड पोलीस स्टेशनच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी छापा टाकला.

 

या कारवाईत राजकुमार हरी जामुनकर (वय 24, सध्या रा. रांझे, ता. भोर, मूळ रा. वस्तापूर, ता. चिखलदरा, जि. अमरावती) याच्या ताब्यात मोठ्या प्रमाणावर देशी व विदेशी दारूचा साठा आढळून आला. हा मद्यसाठा आकाश लहु तावरे (रा. रांझे, ता. भोर) याच्या सांगण्यावरून बेकायदेशीररीत्या ठेवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

कारवाईदरम्यान इंम्पेरियल ब्ल्यू, रॉयल स्टॅग, मॅकडॉवेल्स नं.१, ओकस्मिथ गोल्ड, ओकस्मिथ सिल्व्हर, सिग्नेचर रेअर एज्ड, रॉयल चॅलेंज, डर्बी स्पेशल, क्लासिक गोल्ड, ग्रँड मास्टर्स व्होडका, तसेच टुबॉर्ग, किंगफिशर, बडवायझर, कार्ल्सबर्ग आणि टँगो पंच देशी दारूच्या शेकडो सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. सर्व मिळून जप्त करण्यात आलेल्या मद्यसाठ्याची किंमत ₹53 हजार 475 इतकी असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

 

कारवाईनंतर पंचांसमक्ष जप्ती पंचनामा करण्यात आला. जप्त मालातून प्रत्येक प्रकारातील एक बाटली नमुना म्हणून वेगळी घेण्यात आली असून उर्वरित सर्व मद्यसाठा अधिकृतपणे सीलबंद करून जप्त करण्यात आला आहे.

 

या प्रकरणी पोलीस हवालदार राजेंद्र बारखु मुंढे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून, दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या कारवाईची नोंद राजगड पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून पोलीस हवालदार मुंढे पुढील तपास करीत आहेत. दाखल अंमलदार पोलीस हवालदार अडवाळ यांनी गुन्ह्याची नोंद केली असून, प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक माणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. राजगड पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर मद्यविक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, अशा अवैध व्यवसायांवर पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.


  • 👍

राजगड पोलीस ठाण्यात नवे पीआय संतोष जाधव अॅक्शन मोडमध्ये; अवैध धंदे, गुन्हेगारीविरोधात कडक भूमिका भाडेकरू पडताळणी, कामगार व्हेरिफिकेशन, व्यसनमुक्ती, सायबर जनजागृती आणि सीसीटीव्ही यंत्रणेवर विशेष भर; नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

108
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

राजगड पोलीस ठाण्यात नवे पीआय संतोष जाधव अॅक्शन मोडमध्ये; अवैध धंदे, गुन्हेगारीविरोधात कडक भूमिका भाडेकरू पडताळणी, कामगार व्हेरिफिकेशन, व्यसनमुक्ती, सायबर जनजागृती आणि सीसीटीव्ही यंत्रणेवर विशेष भर; नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

error: Content is protected !!