शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द, शिक्षण क्षेत्राप्रती असलेली निष्ठा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची अखंड तळमळ यामुळे रहाटवडे (ता. हवेली) येथील सुपुत्र तथा आदर्श शिक्षक सुनील चोरघे यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत यशाची उंच शिखरे गाठली आहेत. १९९३ पासून सुरू झालेल्या त्यांच्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी अध्यापन, सामाजिक बांधिलकी आणि संघटनात्मक कार्यातून आपली वेगळी ओळख निर्माण केली असून राज्य व जिल्हास्तरावरील अनेक पुरस्कारांनी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. त्यांच्या या यशाबद्दल संपूर्ण हवेली तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
पुरस्कारांचा सुवर्णमयी प्रवास
सुनील चोरघे यांच्या कार्याची दखल विविध स्तरांवर घेतली गेली आहे. १९९५ मध्ये मुळशी तालुक्याचा तसेच २००५ मध्ये हवेली तालुक्याचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. शिवापूर येथे कार्यरत असताना २००६ मध्ये त्यांना मानाचा ‘गुरुवर्य दादोजी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला, तर २००८ मध्ये आर्वी येथे सेवेत असताना राष्ट्रीय स्तरावरील ‘नॅशनल बिल्डर्स अवॉर्ड’ मिळाला.
सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभळी येथे कार्यरत असलेल्या चोरघे यांना २०२५ मध्ये ‘नालंदा विश्वविद्यालय, महाराष्ट्र राज्य’ यांच्या वतीने ‘ग्राम समृद्धी पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले आहे.
संघटनात्मक कार्यातही ठसा
अध्यापनाबरोबरच शिक्षक संघटनांमधून शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यातही चोरघे यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. २००५ ते २०१० या कालावधीत त्यांनी हवेली तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष म्हणून जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. त्यांच्या कार्यकुशलतेची दखल घेत २०२६ मध्ये त्यांची हवेली तालुका प्राथमिक शिक्षक संघ विभागीय प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सेवेला ईश्वरसेवेची भावना
“शिक्षण क्षेत्रातील सेवा हीच खरी ईश्वरसेवा मानून मी काम केले आहे. मिळालेले पुरस्कार ही जबाबदारीची पावती असून विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या प्रगतीसाठी भविष्यातही कटिबद्ध राहीन,” असे मनोगत सुनील चोरघे यांनी व्यक्त केले.
सुनील चोरघे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल रहाटवडे ग्रामस्थ, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर तसेच मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.










