विंझर : समाज शिक्षण मंडळ संचलित अमृतेश्वर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय तसेच प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच भव्य करिअर मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. पदवी शिक्षणानंतर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोजगार, स्वयंरोजगार व उच्च शिक्षणाच्या संधींची योग्य दिशा मिळावी, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
करिअर आणि ‘जॉब’मधील फरक महत्त्वाचा
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रणजीत हंगेरे व प्रगती गौरखेडे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना हंगेरे यांनी “केवळ नोकरी मिळवणे आणि करिअर घडवणे यात मोठा फरक आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःची क्षमता, उपलब्ध संधी आणि निश्चित ध्येय यांची योग्य सांगड घालणे आवश्यक आहे,” असे सांगितले.
प्रगती गौरखेडे यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात आवश्यक असणाऱ्या सॉफ्ट स्किल्स, व्यक्तिमत्त्व विकास आणि मुलाखतीची तयारी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
कौशल्य विकासावर भर
‘प्रथम एज्युकेशन फाउंडेशन’चे क्लस्टर हेड सिकंदर लोखंडे यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. संस्थेच्या प्रतिनिधींनी रोजगाराभिमुख अल्पमुदत अभ्यासक्रम, व्यावसायिक प्रशिक्षण व कौशल्य विकासाच्या संधींबाबत माहिती दिली. ग्रामीण भागातील युवकांसाठी स्थानिक तसेच शहरी स्तरावर रोजगाराच्या नव्या वाटा खुल्या होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्राचार्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लाटे यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार क्षेत्राची निवड करावी, असे सांगितले. “केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून काळानुसार स्वतःला अपडेट ठेवणे आवश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. योगेश श्रीखंडे यांनी भविष्यातही विद्यार्थ्यांसाठी अशा उपयुक्त उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाची वैशिष्ट्ये
▪ कला, वाणिज्य व विज्ञान शाखेनंतरच्या करिअर संधींवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन
▪ प्रश्नोत्तर सत्रातून विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन
▪ कार्यक्रमाचे नियोजन प्रा. डॉ. अनुजा गावडे (वाणिज्य विभाग) व प्रा. रितेश वांगवड (भूगोल विभाग) यांनी केले
या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि करिअरबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाल्याचे दिसून आले.










