भोर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना मोठा वेग आला असून तालुक्यातील कासुर्डी खे. बा. येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना पुणे जिल्हा सचिव रोहिदास (आबा) पांडुरंग कोंडे यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. अनेक वर्षे उभाठा गटात सक्रिय असलेला निष्ठावंत कार्यकर्ता काँग्रेसमध्ये आल्याने तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विशेषतः वेळू–नसरापूर परिसरात कार्यकर्त्यांचा मोठा संपर्क असलेल्या आबा कोंडे यांच्या निर्णयामुळे आगामी निवडणुकीत काँग्रेसची ताकद वाढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
रोहिदास (आबा) कोंडे यांनी गेल्या सुमारे १८ वर्षांपासून एका विचारधारेसाठी निष्ठेने काम केले. मात्र दीर्घकाळ मेहनत करूनही अपेक्षित न्याय, सन्मान आणि पक्षाकडून योग्य दखल मिळाली नसल्याने स्वाभिमान जपत हा निर्णय घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. “हा निर्णय केवळ पक्षप्रवेशापुरता मर्यादित नाही. हा अन्यायाविरोधातील माझा ठाम निर्णय आहे. प्रामाणिक कार्यकर्त्याला किंमत नसेल, तर लढ्याची दिशा बदलणे अपरिहार्य ठरते,” असे त्यांनी स्पष्ट करत आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. तसेच, पुढील काळात तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी अधिक ताकदीने काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसला तालुक्यात एक नवे बळ मिळाल्याचे मानले जात आहे. विशेषतः ग्रामपातळीवर कार्यकर्त्यांची संघटना मजबूत करण्यासाठी आणि निवडणुकीत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अनुभवी कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश महत्त्वाचा ठरणार आहे. यावेळी आबा कोंडे यांच्यासोबत त्यांच्या अनेक समर्थकांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश करून काँग्रेसच्या संघटनात्मक वाढीस हातभार लावला आहे.
यावेळी संतोष शामराव कोंडे (माजी सरपंच), अक्षय किसन गोळे, समीर पांडुरंग कोंडे, निलेश राजेंद्र कोंडे, प्रवीण पायगुडे, सागर तात्या शिंदे, अक्षय मोळावडे, अजित लाड, अभिजित कोंडे, दीपक ननावरे व सुभाष वाडकर यांनीही काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या सर्व कार्यकर्त्यांचा परिसरात सामाजिक संपर्क आणि स्थानिक प्रश्नांवरील सक्रिय सहभाग लक्षात घेता, हा प्रवेश काँग्रेससाठी लाभदायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी भोर तालुका काँग्रेस अध्यक्ष सतीश चव्हाण, कार्याध्यक्ष शैलेश जाधव, भोर तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष रोहन भोसले तसेच नसरापूर पंचायत समिती गणाचे काँग्रेस उमेदवार डॉ. विजय शिळीमकर यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आबा कोंडे व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत करत काँग्रेसच्या आगामी निवडणूक रणनीतीबाबतही स्पष्ट भूमिका मांडली.
यावेळी बोलताना तालुका काँग्रेस अध्यक्ष सतीश चव्हाण म्हणाले की, “धनशक्तीपेक्षा जनशक्तीवर विश्वास ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांचे काँग्रेसमध्ये मनापासून स्वागत आहे. आबा कोंडे यांच्यासारख्या अनुभवी कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे भोर तालुक्यात काँग्रेसची संघटना अधिक मजबूत होईल. काँग्रेस पक्ष हा भोर तालुक्यात वंचित आघाडी सोबत एकत्रित आलेला आहे. येणाऱ्या निवडणुकीत आम्ही ताकदीने मैदानात उतरणार असून, तालुक्यातील प्रत्येक जागेवर सक्षम उमेदवार उभे करणार आहोत,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या वेळी काँग्रेसकडून तालुक्यातील काही प्रमुख उमेदवारींबाबतही माहिती देण्यात आली. भोंगवली–कामथडी जिल्हा परिषद गटातून वैभव धाडवे पाटील, नसरापूर पंचायत समिती गणातून डॉ. विजय शिळीमकर आणि वेळू गणातून रोहिदास (आबा) कोंडे यांच्या उमेदवारी निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच सोमवार-मंगळवारपर्यंत तालुक्यातील इतर जागांवरही सक्षम उमेदवार जाहीर केले जातील, अशी माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, वेळू–नसरापूर परिसरात उभाठा गटासाठी अनेक वर्षे एकोप्याने काम करून पक्ष वाढवण्याचे कार्य आबा कोंडे यांनी केले होते. मात्र त्यांच्याकडे पक्षाकडून अपेक्षित लक्ष दिले गेले नसल्याने त्यांनी काँग्रेसची वाट निवडल्याची चर्चा सध्या तालुक्यात जोरात आहे. त्यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसला “नवे फळ” मिळाल्याचे बोलले जात असून, आगामी पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसला या प्रवेशाचा निश्चितच फायदा होईल, अशी शक्यता कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. काँग्रेसच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न, विकासकामे आणि स्थानिक पातळीवरील न्यायासाठी अधिक प्रभावीपणे लढणार असल्याचा निर्धारही आबा कोंडे यांनी व्यक्त केला.










