नसरापूर प्रतिनिधी विलास धोंगडे
नसरापूर : भारत सरकारच्या National Book Trust of India तर्फे पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय येथे १३ ते २१ डिसेंबरदरम्यान आयोजित “पुणे पुस्तक महोत्सव २०२५” निमित्त विविध साहित्यिक उपक्रमांना सुरूवात झाली आहे. वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांपैकी एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे “शांतता, पुणेकर वाचत आहेत”. नागरिकांनी जिथे असतील तिथे एका तासासाठी आपल्या आवडीचे पुस्तक वाचावे, असा संदेश शासनाने दिला आहे.
या निर्देशानुसार शंकरराव भेलके महाविद्यालय, नसरापूर येथे दि. ९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते १२ दरम्यान महाविद्यालयाच्या ग्रंथालयात हा उपक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात आला. ग्रंथालय विभागाच्या पुढाकाराने आयोजित या उपक्रमात प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत शांततेत एक तास मनसोक्त पुस्तकवाचन केले.

वाचनासाठी कथा, कादंबऱ्या, चरित्रे, स्पर्धा परीक्षा साहित्य तसेच इतर प्रेरणादायी पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी या उपक्रमामुळे वाचनाची गोडी वाढल्याचे समाधान व्यक्त केले.
उपक्रमाचे नियोजन व उत्कृष्ट समन्वय ग्रंथपाल प्रा. भगवान गावित, एनएसएस अधिकारी प्रा. दयानंद जाधवर आणि श्री. सुमित कांबळे यांनी केले. संपूर्ण उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
महाविद्यालय परिसरात एका तासासाठी निर्माण झालेली वाचनाची शांतता आणि विद्यार्थी-शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे हा उपक्रम खऱ्या अर्थाने यशस्वी ठरला.










