प्रतिनिधी विलास धोंगडे, नसरापुर
नसरापूर (ता. भोर) – नसरापूर ग्रामविकासासाठी महत्त्वाचा टप्पा पार पडत राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार यांच्या पुढाकाराने आणि भोर–मुळशी–राजगड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री. शंकर भाऊ मांडेकर यांच्या विशेष प्रयत्नातून नसरापूर ग्रामपंचायतीतील चार महत्त्वाच्या पायाभूत कामांसाठी एकूण ₹35.5 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीमुळे गावाच्या प्रगतीला मोठा वेग मिळणार असून ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
ओम कॉलनी, स्वामी समर्थ नगर आणि इंदिरा सोसायटी या प्रमुख वसाहतींमध्ये रस्ते व गटारांची स्थिती वर्षानुवर्षे निकृष्ट होती. पावसाळ्यातील पाणी साचणे, वाहतुकीतील अडचणी, स्वच्छतेच्या समस्या यांचा ताण वाढत होता. आता या तीनही कामांसाठी प्रत्येकी ₹11 लाखांची तरतूद करत निधी मंजूर झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच दफनभूमी परिसरासाठी सोलर दिव्यासाठी ₹2.5 लाख मंजूर झाल्याने त्या भागातील सुरक्षा व सुविधा मोठ्या प्रमाणात सुधारतील.
या निधीसाठी सातत्याने पाठपुरावा करून विधायक भूमिका बजावणाऱ्या सरपंच सौ. उषा विक्रम कदम, उपसरपंच श्री. संदीपदादा कदम, माजी उपसरपंच नामदेव चव्हाण आणि अजर तांबोळी यांच्या प्रयत्नांचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. स्थानिक प्रतिनिधींच्या संघटित प्रयत्नांमुळेच ही महत्त्वाची कामे मंजूर झाल्याचे ग्रामस्थांनी व्यक्त केले.
सरपंच सौ. कदम यांनी सांगितले की, “नसरापूरच्या सर्वांगीण विकासासाठी हा निधी अत्यंत मोलाचा आहे. गावातील रस्ते, गटारे व सार्वजनिक सुविधांची स्थिती यातून मोठ्या प्रमाणात सुधारेल आणि प्रगतीचा वेग वाढेल.”
गेल्या काही वर्षांपासून नसरापूर ग्रामपंचायतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकासकामांना गती दिली आहे. रस्त्यांचे डांबरीकरण, स्वच्छता, सांडपाणी व्यवस्था, सार्वजनिक दिवे अशा विविध क्षेत्रांत गावाने प्रगतीची नवी भरारी घेतली आहे. नवीन निधीमुळे ही प्रगती आणखी गतिमान होणार आहे.
नसरापूर ग्रामस्थांनी या निर्णयाचे समाधान व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमदार शंकरभाऊ मांडेकर आणि ग्रामपंचायतीच्या नेतृत्वाचे मनापासून आभार मानले आहेत.










