विंझर | प्रतिनिधी : समीर कांबळे
नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत वेल्हे तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा आपले अभेद्य वर्चस्व सिद्ध करत दणदणीत विजय मिळवला. विंझर–पानशेत आणि वेल्हे–वांगणी या दोन्ही जिल्हा परिषद गटांमध्ये राष्ट्रवादीने बहुसंख्य जागांवर विजय मिळवत ‘घड्याळ’ सुसाट असल्याचे चित्र स्पष्ट केले. विकासकामांचा लेखाजोखा, सातत्यपूर्ण जनसंपर्क आणि स्थानिक प्रश्नांवर ठोस भूमिका यालाच मतदारांनी कौल दिल्याचे दिसून आले.
विंझर–पानशेत गट : अमोल नलावडे यांची विजयाची हॅट्रिक
विंझर–पानशेत गटात राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल नलावडे यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवत ‘हॅट्रिक’ साजरी केली. त्यांनी ८,६७८ मते घेत १,६०२ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला. त्यांच्या विजयाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
याच गटातील पानशेत गणात राष्ट्रवादीच्या सुवर्णा किरण राऊत यांनी ४,५२३ मते घेत १,१४० मताधिक्याने विजय संपादन केला.
दरम्यान, विंझर गणात मात्र चुरशीची लढत पाहायला मिळाली. येथे भारतीय जनता पक्षचे गणेश जागडे यांनी ५,०३२ मते मिळवत १,४०४ मतांच्या फरकाने विजय मिळवून भाजपचे अस्तित्व कायम राखले.
वेल्हे–वांगणी गट : विरोधकांचा सुफडा साफ
वेल्हे–वांगणी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीने ‘क्लीन स्वीप’ देत विरोधकांचा सुफडा साफ केला.
जिल्हा परिषद गट : तानाजी मांगडे यांनी १०,२६२ मते मिळवत अत्यंत अटीतटीच्या लढतीत ५५० मतांनी विजय मिळवला.
वेल्हे गण : सीताताई नंदकुमार खुळे यांनी ५,८५८ मते मिळवत २,३७२ मतांच्या विक्रमी फरकाने ऐतिहासिक विजय नोंदवला.
वांगणी गण : संदीप खुटवड यांनी ४,०३९ मते घेत ४६३ मतांनी विजय मिळवून राष्ट्रवादीचा विजयाचा कळस चढवला.
विकासाच्या राजकारणाला मतदारांची पावती
“हा विजय माझा नसून वेल्हे तालुक्यातील सामान्य जनतेचा आणि कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमांचा आहे,” अशी भावना नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली. गेल्या काही वर्षांत रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील कामे, तसेच दुर्गम भागातील वाड्या–वस्त्यांपर्यंत पोहोचलेला विकास यामुळेच मतदारांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या हातावर विश्वास टाकल्याचे बोलले जात आहे.
गुलालाची उधळण अन् जल्लोष
निकाल जाहीर होताच संपूर्ण वेल्हे तालुक्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतषबाजीत, ढोल–ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. “येणाऱ्या काळात तालुक्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे आणि दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत विकास पोहोचवणे हेच आमचे मुख्य ध्येय असेल,” असे आश्वासन विजयी उमेदवारांनी दिले.
संक्षिप्त निकाल (एकत्रित):
विंझर–पानशेत गट
अमोल नलावडे (राष्ट्रवादी) – १,६०२ मतांनी विजयी | एकूण मते: ८,६७८
विंझर गण : गणेश जागडे (भाजप) – १,४०४ मतांनी विजयी | एकूण मते: ५,०३२
पानशेत गण : सुवर्णा किरण राऊत (राष्ट्रवादी) – १,१४० मतांनी विजयी | एकूण मते: ४,५२३
वेल्हे–वांगणी गट
तानाजी मांगडे (राष्ट्रवादी) – ५५० मतांनी विजयी | एकूण मते: १०,२६२
वेल्हे गण : सीताताई नंदकुमार खुळे (राष्ट्रवादी) – २,३७२ मतांनी विजयी | एकूण मते: ५,८५८
वांगणी गण : संदीप खुटवड (राष्ट्रवादी) – ४६३ मतांनी विजयी | एकूण मते: ४,०३९










