खेड शिवापुर : प्रतिनिधी विलास धोंगडे
लग्नसोहळ्याच्या उत्साही वातावरणात चोरट्यांनी संधी साधत सोन्याचांदीचे दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम असा सुमारे ₹2 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना 3 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी साधारण 2.21 ते 2.30 या वेळेत खेड शिवापुर गावच्या हद्दीतील नक्षत्र पॅलेस येथे घडली.
या प्रकरणी कविता विरभद्र अंबोले (वय 49, रा. सरगम बी चिंग, नांदेड सिटी, पुणे) यांनी राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
फिर्यादी आपल्या मुलीच्या लग्न समारंभात सहभागी झाल्या होत्या. लग्नाची विधी सुरू असताना त्यांनी स्टेजवरील नवरा-नवरीच्या सोफ्यावर ठेवलेली गोल्डन रंगाची पर्स तात्पुरती ठेवली होती. गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने ही पर्स उचलून नेली.
चोरी गेलेल्या ऐवजामध्ये खालील वस्तूंचा समावेश आहे –
– 60,000 रुपये किमतीची एक तोळ्याची सोन्याची चैन
– 12,000 रुपये किमतीचे सोन्याचे कानातील झुबे
– 1,50,000 रुपये किमतीचे डायमंड मंगळसूत्र
– 5,000 रुपये किमतीची चांदीची श्रीमाळ
– 5,000 रुपये किमतीची चांदीची मूर्ती
– 3,000 रुपयांचा मोबाईल फोन
– 40,000 रुपये रोख रक्कम
एकूण अंदाजे ₹2,75,000 रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद पोलिसांत करण्यात आली आहे.
या घटनेचा तपास मपो.हवा. निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. लग्नसोहळ्यातील सीसीटीव्ही फुटेज आणि उपस्थित पाहुण्यांच्या चौकशीतून पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लग्नसोहळ्यातील गर्दी आणि गोंधळाचा फायदा घेत चोरट्यांनी अशा घटना घडवण्याचे प्रकार वाढले असून, नागरिकांनी मौल्यवान वस्तूंवर लक्ष ठेवावे, अशी सूचना पोलिसांनी केली आहे.










