युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत भोर तालुक्यातील अतिशय दुर्गम व दऱ्याखोऱ्यात वसलेल्या मौजे साळुंगण येथे पंचक्रोशीतील नागरिकांसाठी मोफत नेत्रतपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया निवड शिबीर तसेच सर्वसाधारण आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबिरामध्ये तब्बल १२५ नागरिकांची नेत्रतपासणी करण्यात आली. तपासणीनंतर १२ नागरिकांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली असून त्यांची पुढील उपचार प्रक्रिया नियोजित करण्यात आली आहे. तसेच आरोग्य शिबिरात सर्दी, ताप, खोकला, साथीचे आजार, रक्तदाब (बीपी), मधुमेह (शुगर) यांसह विविध आजारांची तपासणी करून नागरिकांना आवश्यक औषधोपचारही करण्यात आले.
शिबिरासाठी डिलिजंट नर्सिंग ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने श्री. ब्रिजेश उपाध्याय व श्री. उमेश कांबळे यांनी नेत्रतपासणी केली, तर इतर आजारांची तपासणी डॉ. रविकरण शिनगारे यांनी केली. दुर्गम भागातील नागरिकांना तज्ज्ञ वैद्यकीय सेवा उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी पसुरे गावचे तंटामुक्त समिती अध्यक्ष मनोज धुमाळ, साळुंगणचे उपसरपंच गोपी दूरकर, माजी उपसरपंच अनंता दूरकर, सामाजिक कार्यकर्ते सुभाष दूरकर, बाळू दूरकर, शंकर दूरकर, पंढरी दूरकर, बापू दूरकर, अमोल दूरकर यांच्यासह शेकडो ग्रामस्थ, महिला व युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिराचे आयोजन वेळवंड खोऱ्यातील सामाजिक कार्यकर्ते तसेच पसुरे महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या वतीने करण्यात आले होते. या उपक्रमासाठी भारती हॉस्पिटलच्या भिसे मॅडम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभय तिडके तसेच नेरे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. फुटाणे यांनी विशेष सहकार्य केले.
दुर्गम डोंगराळ भागात प्रथमच अशा प्रकारचे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून आला. ग्रामीण भागात अशा आरोग्यविषयक उपक्रमांची मोठी गरज असून भविष्यातही संपूर्ण मावळ परिसरात जनहिताचे उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती तंटामुक्त समिती अध्यक्ष मनोज ज्ञानेश्वर धुमाळ यांनी दिली.










