समाज शिक्षण मंडळाचे अमृतेश्वर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, विंझर येथे विद्यार्थी विकास मंडळ, वनस्पतीशास्त्र विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘टाकाऊ कचरा व्यवस्थापन’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धन आणि घनकचरा व्यवस्थापनाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते नारळ वृक्षारोपण करून करण्यात आली. त्यानंतर प्रतिमा पूजन व विद्यापीठ गीताने कार्यक्रमास औपचारिक प्रारंभ झाला. कार्यशाळेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांच्या हस्ते झाले. पाहुण्यांचे स्वागत व सत्कारानंतर विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. विजय कदम यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक सादर केले. आयक्यूएसी समन्वयक प्रा. डॉ. राहुल कांबळे यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करत कचऱ्याच्या पुनर्वापराचे महत्त्व अधोरेखित केले.
उद्घाटन सत्रात प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी “स्वच्छ परिसर, सुदृढ जीवन, टाकाऊपासून टिकाऊ आणि घनकचरा व्यवस्थापन ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन करत कचरा व्यवस्थापनाच्या आधुनिक पद्धती व तंत्रज्ञानाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. घरगुती व सार्वजनिक ठिकाणी निर्माण होणाऱ्या ओल्या व सुक्या कचऱ्याचे योग्य वर्गीकरण, ई-कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट, तसेच कचरा उघड्यावर टाकल्यामुळे होणारे हवा व पाण्याचे प्रदूषण आणि त्यातून उद्भवणाऱ्या आजारांबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना जागरूक केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजीव लाटे यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. बाळासाहेब केंदळे आणि प्रा. डॉ. महादेव डोंगरे यांनी कचरा व्यवस्थापनाचे वाढते महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांना ५-आर (Refuse, Reduce, Reuse, Repurpose, Recycle) तत्त्वांची ओळख करून दिली. अनावश्यक वस्तूंना नकार देणे, कचरा निर्मिती कमी करणे, पुनर्वापर, नव्या उपयोगासाठी रूपांतर आणि पुनर्चक्रीकरण या संकल्पनांमुळे पर्यावरण संवर्धनासोबत आर्थिक फायदेही मिळू शकतात, असे त्यांनी उदाहरणांसह सांगितले. सेंद्रिय कचऱ्यापासून खतनिर्मिती व बायोगॅस निर्मितीद्वारे ऊर्जा मिळविण्याच्या संधींबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना कचरा ही केवळ समस्या नसून योग्य नियोजन व व्यवस्थापनाद्वारे ती एक संधी ठरू शकते, याची सखोल जाणीव झाली.
कार्यक्रमास डॉ. सुरेश मुळूक, ग्रंथपाल रामचंद्र मोकाशी, प्रा. अंकुश नामदास, प्रा. डॉ. सीमा चौधरी, प्रा. डॉ. शितल सेंडकर, प्रा. डॉ. योगेश श्रीखंडे, डॉ. परमेश्वर गडकर, डॉ. अनुजा गावडे, प्रा. डॉ. ज्योती भाटे, डॉ. रितेश वांगवाड, प्रा. सुजितकुमार माने, डॉ. दीपक शेळके, प्रा. मनोजकुमार टापरे, प्रा. प्रकाश चिकटे, प्रा. किरण जाधव, प्रा. डॉ. महादेव चांभारे, प्रा. कोमल आधवडे, श्री विजय लिम्हण, श्री विलास गायकवाड यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यशाळेचे नियोजन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. विजय कदम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. ज्ञानेश्वरी यादव व कु. सुहानी घोरे (प्रथम वर्ष कला) यांनी केले, तर छायाचित्रण प्रा. डॉ. महादेव चांभारे यांनी केले. शेवटी कार्यशाळा समन्वयक डॉ. दीपक शेळके यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.










