कामाच्या पैशाच्या कारणावरून झालेल्या वादातून जांभळी (ता. भोर) येथे एका मजुराला मारहाण करून लोखंडी गजाने डोक्यात मारून जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संबंधित व्यक्तींविरोधात राजगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रावसाहेब हरीश्चंद्र जाधव (वय 35 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. मार्गासनी, ता. वेल्हा, जि. पुणे) हे जांभळी (ता. भोर) येथील त्यांच्या दाजींच्या घरी गेले होते. अमोल पांगारकर यांच्याकडे केलेल्या कामाचे पैसे मिळावेत, यासाठी त्यांना बोलावण्यात आले होते. मात्र पैसे न मिळाल्याचे सांगण्यात आले.
यावेळी फिर्यादीने संबंधित मालकास फोन करून पैशाबाबत विचारणा केली. याचा राग मनात धरून दाजी राजु मोहिते व त्यांचा भाचा विनोद मोहिते (दोघेही रा. जांभळी, ता. भोर) यांनी “तू फोन का केला?” असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर दोघांनी हाताने मारहाण केली, तसेच भाचा विनोद याने घरातून लोखंडी गज आणून तो फिर्यादीच्या डोक्यात मारल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या मारहाणीमध्ये फिर्यादीस दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. या घटनेबाबत राजगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास राजगड पोलीस स्टेशन करत आहे.







