राजगड प्रतिनिधी महेश सणस
एशियन महाविद्यालय व एशियन अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड रिसर्चतर्फे भारतीय संविधान दिन अत्यंत उत्साहात, गौरवपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्षा मा. डॉ. अनिता साप्ते, उपाध्यक्ष आनंद साप्ते, तसेच सचिव अनिल साप्ते यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली आणि एशियन कॉलेज वेल्हेच्या प्रभारी प्राचार्य प्रा. स्वाती काळे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम सुंदररित्या पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी संविधानाची प्रस्तावना (उद्देशिका) सामूहिकरीत्या वाचून झाली. लोकशाही मूल्यांची जपणूक आणि संविधानाबद्दल आदराची भावना विद्यार्थी-शिक्षकांच्या मनात दृढ व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता.
या कार्यक्रमात महाविद्यालयासाठी अभिमानाचा क्षण ठरला — प्रथम वर्ष कला शाखेतील विद्यार्थी शिवाजी कचरे यांची महाराष्ट्र सुरक्षा दलात सुरक्षारक्षक म्हणून निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या उपस्थितीत शिवाजी कचरे यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करून गौरव करण्यात आला. संपूर्ण उपस्थितीने उत्स्फूर्त टाळ्यांच्या गजरात हा अविस्मरणीय क्षण साजरा झाला.
यानिमित्ताने विद्यार्थ्यांना संविधानातील महत्त्वाच्या घडामोडी, मूलभूत हक्क-कर्तव्ये, तसेच जबाबदार नागरिकत्वाचे भान देणारे मार्गदर्शनही करण्यात आले. “युवक-युवतींनी संविधान समजून घेतले तरच त्याची मूलतत्त्वे खऱ्या अर्थाने जोपासली जातील,” असा संदेश शिक्षकांनी दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी देशभक्तीचा नारा देत घोषवाक्य उच्चारले —
“भारतीय युवा जागा हो, संविधानाचा धागा हो…!










