आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

महिला नेतृत्वाची ठोस पावले : अमृता गायकवाड यांच्या उमेदवारीतून स्व. शंकरआण्णांचे स्वप्न साकार होणार


भिगवण | प्रतिनिधी : सागर जगदाळे

भिगवण पंचायत समिती गणाच्या राजकारणात आता महिला नेतृत्वाचा ठाम आवाज उमटताना दिसत आहे. भारतीय जनता पार्टीकडून अमृता आप्पासाहेब गायकवाड यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सुरू असून, त्यांच्या रूपाने भिगवणच्या राजकारणात सक्षम, सुशिक्षित आणि निर्णयक्षम महिला नेतृत्व उभे राहत असल्याचे चित्र आहे.

सन २००७ मध्ये पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढताना स्वर्गीय शंकरआण्णा गायकवाड यांचा अत्यंत अटीतटीच्या लढतीत पराभव झाला होता. मात्र लोकांशी असलेली त्यांची नाळ, समाजकारणातील सक्रिय सहभाग आणि प्रामाणिक राजकीय भूमिका आजही जनमानसात जिवंत आहे. त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या राजकीय इच्छेला दिशा देण्याची संधी आता त्यांच्या कुटुंबातील पुढील पिढीला मिळताना दिसत आहे.

स्व. शंकरआण्णांच्या कार्याचा वारसा पुढे नेताना गायकवाड कुटुंबाने केवळ राजकारण नव्हे तर समाजकारणालाही तितकेच महत्त्व दिले आहे. परिवर्तन युवा फाउंडेशनच्या माध्यमातून वृक्षारोपण, सामाजिक उपक्रम, तसेच गोरगरिबांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवण्यात आला. भिगवण ग्रामपंचायतीतील कथित चुकीच्या कारभाराविरोधात पुराव्यानिशी भूमिका घेतल्यामुळे गायकवाड कुटुंबाची निर्भीड प्रतिमा निर्माण झाली आहे.

अमृता गायकवाड या केवळ राजकीय वारसा म्हणून नव्हे, तर स्वतंत्र विचारसरणीचे आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत. महिला, तरुण, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख तयार होत आहे. महिलांच्या स्वावलंबनासाठी, शिक्षणासाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा निर्णायक सहभाग वाढवण्यासाठी त्यांचे स्पष्ट धोरण असल्याचे सांगितले जाते.

लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग, तर विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे, या घटनांमधून गायकवाड कुटुंबाचा ‘पक्षापेक्षा जनतेशी निष्ठा’ हा दृष्टिकोन अधोरेखित होतो. त्यामुळे अमृता गायकवाड यांची ओळख केवळ पक्षनिष्ठेपुरती मर्यादित न राहता जनतेच्या विश्वासाशी जोडलेली आहे.

आजच्या राजकारणात स्वच्छ प्रतिमा, पारदर्शकता आणि संवेदनशीलता या गुणांची कमतरता जाणवत असताना, अमृता गायकवाड यांच्या रूपाने भिगवण पंचायत समिती गणात नवा पर्याय उभा राहत असल्याचे बोलले जात आहे. महिलांमध्ये त्यांना विशेष पाठिंबा मिळत असून, त्यांच्या नेतृत्वात स्थानिक प्रश्नांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

भारतीय जनता पार्टीने संधी दिल्यास पंचायत समितीबरोबरच जिल्हा परिषद निवडणूकही पूर्ण ताकदीने लढवण्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. महिला नेतृत्वाला बळ देणारी ही उमेदवारी भिगवणच्या राजकारणाला नवी दिशा देईल का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.


  • 👍
97
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!