भोर (प्रतिनिधी) : विलास धोंगडे
भोर तालुक्यातील नसरापूर ग्रामातील सामाजिक कार्यकर्ते श्री. अझरुद्दीन राजमहंमद तांबोळी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भोर तालुका अल्पसंख्याक सेलच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार श्री. सुनीलजी तटकरे, तसेच भोर-राजगड-मुळशीचे आमदार श्री. शंकरभाऊ मांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती जाहीर झाली.
या निमित्ताने आज नसरापूर येथे आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या विशेष कार्यक्रमात अझरुद्दीन राजमहंमद तांबोळी यांच्यासह नसरापूरातील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या वेळी पक्षाचे तालुका अध्यक्ष व मा. पंचायत समिती सदस्य श्री. संतोष घोरपडे यांनी अझरुद्दीन राजमहंमद तांबोळी यांच्या नियुक्तीपत्राचा अधिकृत सुपूर्द करून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
अझरुद्दीन राजमहंमद तांबोळी हे समाजातील वंचित, अल्पसंख्याक आणि सर्वसामान्य घटकांच्या प्रश्नांवर सातत्याने काम करणारे म्हणून ओळखले जातात. कुठेही अन्याय, अत्याचार किंवा सामाजिक अन्यायाची घटना घडल्यास सर्वात पहिले धाव घेणारे आणि पीडितांना मदतीचा हात देणारे ‘जनतेचे कार्यकर्ते’ म्हणून त्यांची ओळख आहे. नसरापूर परिसरातील युवक, शेतकरी आणि गरजू कुटुंबांसाठी अझरुद्दीन राजमहंमद तांबोळी यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी अझरुद्दीन राजमहंमद तांबोळी यांच्या नियुक्तीबद्दल समाधान व्यक्त करत, त्यांच्या नेतृत्वाखाली अल्पसंख्याक समाजातील प्रश्नांना न्याय मिळेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद भोर तालुक्यात अधिक वाढेल, असा विश्वास व्यक्त केला.

श्री. संतोष घोरपडे यांनी सांगितले की, “अझरुद्दीन राजमहंमद तांबोळी सारख्या सामाजिक कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेश म्हणजे जनतेशी असलेले नाते आणखी दृढ होणे होय. पक्षाच्या विचारांना जनतेपर्यंत पोहोचवण्यात त्यांचे योगदान मोलाचे ठरेल.”
कार्यक्रमाच्या शेवटी अझरुद्दीन राजमहंमद तांबोळी यांनी सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभार मानत सांगितले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी सामान्य जनतेसाठी, विशेषतः अल्पसंख्याक समाजासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचा संकल्प करतो.”
या कार्यक्रमाला तालुका व ग्रामपंचायत पातळीवरील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर परिसरात अभिनंदनाचे वातावरण निर्माण झाले.










