आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

शिंदेवाडी येथे सोरट जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; तब्बल ३० लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त


भोर तालुक्यातील मौजे शिंदेवाडी गावाच्या हद्दीत जुन्या पुणे–सातारा रस्त्यालगत हॉटेल आमराईच्या बाजूला पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या कथित सोरट जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून, घटनास्थळावरून तब्बल ३० लाख ६५ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, शिंदेवाडी येथील जुन्या पुणे-सातारा रस्त्यालगत असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर सोरट नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकला असता अनेकजण जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच काही जणांनी घटनास्थळावरून पळ काढला, तर सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

या कारवाईत सचिन अंकुश बागल (वय ४७, रा. कात्रज), मनोज दिनकर काळाणे (वय ५३, रा. कात्रज), सशांक मच्छिंद्र मेमाणे (वय ३०, रा. धनकवडी), गणेश पांडुरंग वाळुंज (वय ३९, रा. कात्रज गाव), धनाजी राजाभाऊ जाधव (वय ३६, रा. विश्वकर्मा नगर, कात्रज) आणि निखील रामचंद्र तुगंतकर (वय ३०, रा. कात्रज गाव) या सहा जणांना ताब्यात घेण्यात आले. याशिवाय घटनास्थळावरून अन्य दहा ते बारा जण पळून गेल्याची माहिती असून त्यांचा शोध सुरू आहे.

छाप्यामध्ये जुगारासाठी वापरण्यात येणारे डिजिटल सोरट मशीन, त्यावरील विविध चिन्हे असलेले टेबल, प्लास्टिक व लोखंडी स्टुल, खुर्च्या, जुगाराचे चार्ट, हिशोबाच्या वह्या, कच्च्या स्लिपा, भावदर्शक फलक, ओपन-क्लोज बोर्ड, पत्त्यांचे बॉक्स आदी साहित्य जप्त करण्यात आले. तसेच जुगार खेळण्यासाठी वापरली जाणारी मोठ्या प्रमाणातील टोकनही पोलिसांनी ताब्यात घेतली.

याशिवाय घटनास्थळावरून विविध कंपन्यांचे महागडे मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून त्यामध्ये रिअलमी, सॅमसंग एस-२३ अल्ट्रा, ॲपल आयफोन-१४, व्हिवो, सॅमसंग गॅलेक्सी, वनप्लस-११, गुगल पिक्सेल, ओप्पो एफ-२९ प्रो आणि सॅमसंग फोल्ड-५ या मॉडेल्सचा समावेश आहे. तसेच भारतीय चलनातील दोन लाख अकरा हजार सहाशे वीस रुपयांची रोख रक्कमही पोलिसांनी जप्त केली आहे.

कारवाईदरम्यान घटनास्थळावर उभ्या असलेल्या अकरा दुचाकी आणि एक महिंद्रा एक्सयूव्ही ७०० चारचाकी वाहनही पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये सुजुकी एक्सेस, टीव्हीएस ज्युपिटर, हिरो स्प्लेंडर प्लस, होंडा ट्विस्टर, टीव्हीएस व्हेगो, होंडा ॲक्टिव्हा, होंडा ड्रीम युगा आणि इलेक्ट्रिक दुचाकींचा समावेश आहे. या सर्व वाहनांची एकत्रित किंमत लाखो रुपयांच्या घरात असल्याचे सांगण्यात आले.

या संपूर्ण कारवाईत जप्त करण्यात आलेल्या साहित्यामध्ये जुगाराचे डिजिटल मशीन, साहित्य, मोबाईल फोन, रोख रक्कम, टोकन, दुचाकी आणि चारचाकी वाहन असा एकूण ३० लाख ६५ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

या प्रकरणी संबंधित सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनास्थळावरून पसार झालेल्या इतर संशयितांचा शोध सुरू आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, या कारवाईमुळे भोर तालुक्यातील अवैध जुगार व्यवसायावर मोठा आघात झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.


  • 👍
107
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!