आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

राजगड पोलीस ठाण्यात नवे पीआय संतोष जाधव अॅक्शन मोडमध्ये; अवैध धंदे, गुन्हेगारीविरोधात कडक भूमिका भाडेकरू पडताळणी, कामगार व्हेरिफिकेशन, व्यसनमुक्ती, सायबर जनजागृती आणि सीसीटीव्ही यंत्रणेवर विशेष भर; नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन


राजगड पोलीस ठाण्याचा कार्यभार नुकताच स्वीकारलेल्या पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी पदभार स्वीकारताच कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी कठोर भूमिका घेतली आहे. कार्यभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे, गुन्हेगारी प्रवृत्ती, भाडेकरू पडताळणी, कंपन्यांतील कामगारांची पोलीस पडताळणी, युवकांमधील व्यसनाधीनता, सायबर गुन्हे आणि पॉक्सो जनजागृती यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे राजगड पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीत मोठा बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

पत्रकार परिषदेत बोलताना पीआय संतोष जाधव यांनी स्पष्ट केले की, राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणत्याही प्रकारचे अवैध व्यवसाय सहन केले जाणार नाहीत. हातभट्टीची दारू, गावठी दारू, अवैध मद्यविक्री, गुटखा, पानमसाला, मटका, जुगार, गांजा तसेच इतर सर्व बेकायदेशीर धंद्यांवर सातत्याने धडक कारवाई केली जाईल. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून अशा प्रवृत्तींना आळा घालण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

 

शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा, पानमसाला, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. तसेच बदललेले सायलेंसर बसवून कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट व इतर दुचाकीस्वारांवरही विशेष मोहीम राबवून कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कंपन्या, कारखाने आणि विविध औद्योगिक आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व कामगारांची तसेच सिक्युरिटी गार्ड आणि इतर कर्मचाऱ्यांची पोलीस पडताळणी करणे बंधनकारक राहणार आहे. संबंधित कर्मचाऱ्यांची माहिती पोलीस ठाण्यात देणे आवश्यक असून नियमांचे पालन न करणाऱ्या व्यवस्थापनावर तसेच संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. आदेशांचे उल्लंघन झाल्यास भारतीय न्याय संहितेतील लागू तरतुदींसह कलम १८८ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही त्यांनी दिला.

 

घरमालकांनी आपल्या घरात किंवा इमारतीत राहणाऱ्या प्रत्येक भाडेकरूची संपूर्ण माहिती, ओळखपत्रे आणि भाडेकराराची प्रत राजगड पोलीस ठाण्यात जमा करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाडेकरूंची नोंद व्यवस्थित असल्यास गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर नियंत्रण ठेवणे अधिक सोपे होईल, असे त्यांनी नमूद केले.

 

सध्याची तरुण पिढी विविध प्रकारच्या व्यसनांच्या आहारी जात असल्याबद्दल चिंता व्यक्त करत युवकांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असल्याचे पीआय जाधव यांनी सांगितले. शाळा, महाविद्यालये आणि गावपातळीवर पॉक्सो कायदा, सायबर गुन्हे, सोशल मीडिया फसवणूक आणि सामाजिक जबाबदारी याबाबत मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करून युवकांना योग्य दिशा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

 

गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक गावात, प्रमुख चौकांमध्ये आणि महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. ग्रामपंचायती, स्थानिक संस्था आणि नागरिकांच्या सहभागातून ही मोहीम राबविण्यात येणार असून त्यामुळे गुन्ह्यांचा तपास अधिक वेगाने आणि प्रभावीपणे करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या कोणत्याही अवैध धंद्याची, गुन्हेगारी कृत्याची किंवा संशयास्पद हालचालींची माहिती नागरिकांनी पोलिसांना द्यावी, असे आवाहन करत माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. नागरिकांच्या सहकार्याशिवाय गुन्हेगारीमुक्त समाज निर्माण होऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

दरम्यान, यापूर्वीही विविध अधिकाऱ्यांकडून अशाच प्रकारच्या घोषणा करण्यात आल्या होत्या. त्यामुळे नव्या पोलीस निरीक्षकांनी जाहीर केलेल्या उपाययोजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती प्रभावीपणे होते, अवैध धंद्यांवर कितपत नियंत्रण मिळते आणि राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था किती सक्षम होते, याकडे आता सर्वसामान्य नागरिकांसह व्यापारी, शेतकरी आणि युवकांचेही लक्ष लागले आहे.


  • 👍

राजगड पोलीस ठाण्यात नवे पीआय संतोष जाधव अॅक्शन मोडमध्ये; अवैध धंदे, गुन्हेगारीविरोधात कडक भूमिका भाडेकरू पडताळणी, कामगार व्हेरिफिकेशन, व्यसनमुक्ती, सायबर जनजागृती आणि सीसीटीव्ही यंत्रणेवर विशेष भर; नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

107
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

राजगड पोलीस ठाण्यात नवे पीआय संतोष जाधव अॅक्शन मोडमध्ये; अवैध धंदे, गुन्हेगारीविरोधात कडक भूमिका भाडेकरू पडताळणी, कामगार व्हेरिफिकेशन, व्यसनमुक्ती, सायबर जनजागृती आणि सीसीटीव्ही यंत्रणेवर विशेष भर; नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

error: Content is protected !!