भोर : हवेली तालुक्यातील गोगलवाडी येथे कौटुंबिक वादातून मामाने पुतण्यावर कोयत्याने हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश उत्तम इंगुळकर (वय 42, रा. कामथडी ता. भोर) हे दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी रात्री साडेआठच्या सुमारास गोगलवाडी येथील त्यांच्या मामाच्या घरी वारस हक्क नोंदीबाबत विचारणा करण्यासाठी गेले होते. यावेळी आरोपी विवेक विष्णु गोगावले याने संतापून घरातील कपाटाखाली ठेवलेला कोयता काढून इंगुळकर यांच्या डाव्या कानावर व डोक्यावर वार केला.
या हल्ल्यात इंगुळकर जखमी झाले असून आरोपीने त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेनंतर इंगुळकर यांनी राजगड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार राणे करीत असून पुढील कारवाई सुरू आहे.






