राजगड, प्रतिनिधी
(राजेंद्र रणखांबे)
राजगड तालुक्यात इयत्ता दहावीच्या परीक्षेला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली असून तालुक्यातील तीन परीक्षा केंद्रांवर एकूण ६२४ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा व परीक्षेला सकारात्मक वातावरणात सुरुवात व्हावी यासाठी तोरणा विद्यालय, वेल्हे येथे विद्यार्थ्यांचे पेन व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य सीता खुळे व माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद देशमाने यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी खंडू गायकवाड, अमर पवार, विकास कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
तालुक्यातील सरस्वती विद्यालय, आंबवणे येथे सर्वाधिक ३२७ विद्यार्थी परीक्षेस बसले असून केंद्र संचालक अनिल गरड तसेच सहकार्य म्हणून एस. के. साळुंखे व संजय पगार यांनी नियोजनाची जबाबदारी सांभाळली. वंजारी येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे १४९ विद्यार्थी परीक्षेत सहभागी झाले असून केंद्र संचालक भगवान बेल्हेकर व उपकेंद्र संचालक अजित कोंढाळकर यांनी कामकाज पाहिले.
तर तोरणा विद्यालय, वेल्हे येथे १४८ विद्यार्थी परीक्षेला बसले असून केंद्र संचालक संतोष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा सुरळीत पार पडत आहे. येथे विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व पेन देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमावेळी जेष्ठ शिक्षक तानाजी सागळे, बोर्डाच्या बैठक पथकातील श्री. जाधव, माजी शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने परीक्षा देण्याचे आवाहन मान्यवरांनी यावेळी केले.










