विंझर प्रतिनिधी : समीर कांबळे
पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजगड तालुक्यात सक्रिय असलेल्या सर्व व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिनना वेल्हे पोलीस स्टेशनने अधिकृत नोटीस बजावली आहे. सामाजिक शांतता आणि कायदा-सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी, तसेच जाती-धर्मातील तेढ टाळण्यासाठी पोलिसांनी ही कठोर भूमिका घेतली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती आणि ग्रुप ॲडमिन दोघांवरही प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जाणार असून, यामध्ये १ ते ७ वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची तरतूद असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
ॲडमिनसाठी ‘हे’ नियम पाळणे बंधनकारक:
सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते यांनी जारी केलेल्या नोटीसमध्ये ग्रुप ॲडमिनच्या जबाबदाऱ्या स्पष्ट करण्यात आल्या आहेत.
सक्त मनाई: जाती, धर्म, वैयक्तिक/राजकीय वाद, भावकीतील तंटे, जमीन-शेतीसंबंधी वाद किंवा धार्मिक देव-देवतांचे, ग्रंथांचे आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ किंवा लिंक शेअर करण्यास पूर्णतः मनाई आहे.
सायबर सुरक्षेचा इशारा: सोशल मीडियावर फिरणाऱ्या APK लिंक किंवा सायबर फसवणुकीच्या कोणत्याही संशयास्पद लिंक ग्रुपमध्ये शेअर करू नयेत, तसेच त्या डाउनलोडही करू नयेत.
तातडीने ॲक्शन: कोणत्याही सदस्याने आक्षेपार्ह मजकूर शेअर केल्यास त्याला तात्काळ ग्रुपमधून काढून टाकावे.
ग्रुप सेटिंग: ग्रुपची सेटिंग त्वरित “Only for Admin” (केवळ ॲडमिनसाठी) ठेवावी.
नियम मोडल्यास गंभीर परिणाम!
पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, जर कोणत्याही व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये धार्मिक भावना दुखावणारे किंवा दोन समाजांत तेढ निर्माण करणारे मेसेज, पोस्ट अथवा लिंक आढळून आले, तर संबंधित पोस्ट करणारी व्यक्ती आणि ग्रुप ॲडमिन या दोघांवरही कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
पोलिसांनी दिलेल्या या नोटिसीला न्यायालयीन पुरावा म्हणूनही ग्राह्य धरले जाणार आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिननी या सूचनांचे अत्यंत काटेकोर पालन करावे, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा सक्त इशारा वेल्हे पोलिसांनी दिला आहे.










