वरवे, ता. भोर : प्रतिनिधी विलास धोंगडे
वरवे गावात आज सकाळी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. गावातील काही युवक शेटे यांच्या विहिरीवर पोहण्यासाठी गेले असता त्यापैकी १७ वर्षीय स्वराज संजय यादव हा पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडला. या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या वेळेस स्वराज आणि त्याचे मित्र पोहण्यासाठी विहिरीवर गेले होते. पोहताना अचानक खोल पाण्यात त्याचा तोल गेल्याने तो विहिरीत बुडाला. वर न आल्याने मित्रांनी आरडाओरडा करून गावकऱ्यांना याची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि फायर ब्रिगेडचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सध्या स्वराजचा शोध घेण्यासाठी बचाव पथक जोरदार प्रयत्न करत आहे. विहिरीची खोली आणि पाण्याचा अंधार यामुळे शोधकार्याला मोठ्या अडचणी येत आहेत.
स्वराजच्या अकस्मात मृत्यूने यादव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात वातावरण अतिशय हळहळ व्यक्त करणारे झाले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.







