नसरापूर: प्रतिनिधीविलास धोंगडे
वेळू–नसरापूर जिल्हा परिषद गटाचा स्नेहमेळावा कुंभारकर लॉन्स, नसरापूर येथे अत्यंत उत्साहात पार पडला. “चला बदल घडवूया, परिवर्तनाचे साक्षीदार होऊया” या घोषवाक्याने भरलेला हा कार्यक्रम कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीने गजबजून गेला. या मेळाव्याचे अध्यक्षस्थान मा. विजय कोलते यांनी भूषवले होते.

भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि मा. गणेशभैय्या खुटवड मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित या मेळाव्यात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी गणेश सुरेश खुटवड यांनाच तिकीट द्यावे अशी एकमुखाने मागणी झाली. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “राजकारणात अनेक जण परिस्थितीनुसार पक्ष बदलतात, पण गणेश खुटवड यांनी कधीही तुतारी किंवा पवार साहेबांची विचारधारा सोडली नाही. निष्ठा, सातत्य आणि लोकांमधील जनसंपर्क पाहता पक्षाने यावेळी त्यांनाच संधी द्यावी.”

कार्यक्रमात बोलताना गणेश खुटवड यांनी वेळू–नसरापूर गटातील विकासाच्या कामांवर टोकदार भाष्य केले. “या भागातील विकास हा अनेक वर्षे मागेच राहिला आहे. काही गावांत वारंवार लोकप्रतिनिधी निवडून आले पण त्यांच्या गावांची मूलभूत कामे अजूनही पूर्ण नाहीत. उमेदवार स्वतःच्या महत्त्वाकांक्षांवर बोलतात, पण विकासावर कोणीही बोलायला तयार नाही,” अशी टीका त्यांनी केली. ते पुढे म्हणाले की, “मी या गटातील लोकांच्या प्रश्नांसाठी, खऱ्या अर्थाने विकास करण्यासाठी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक आहे. पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला तर गटाचा सर्वांगीण विकास करून दाखवेन.”

तुतारी पक्षाकडून सध्या काही नावे चर्चेत असली तरी गणेश खुटवड यांनी स्पष्ट केले की, “पक्ष ज्याला तिकीट देईल, त्याच्यासाठी आम्ही सर्वजण प्रामाणिकपणे काम करू. महाविकास आघाडी एकजुटीने लढली तर वेळू–नसरापूर गटातून निश्चितपणे विजय मिळवू.”

गणेश खुटवड यांच्या कार्याचा उल्लेखही मेळाव्यात वारंवार झाला. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेतून २०१० पासून ते गड–किल्ले संवर्धन, दुर्गसेवा, रक्तदान शिबिरे, महिलांसाठी गृहपयोगी साहित्य वाटप, पुरग्रस्तांना मदत अशा अनेक उपक्रमांत अग्रेसर आहेत. BCA आणि MBA पूर्ण करून त्यांनी बांधकाम व्यवसाय सुरू केला, पण सामाजिक कार्याचा ध्यास कायम ठेवला. २०१२ पासून राजकारणात सक्रिय होत त्यांनी राष्ट्रवादी (शरद पवार गट) विचार जनतेपर्यंत पोचवला. २०१७ मध्ये उमेदवारी मिळाली नाही तरीही त्यांनी पक्ष निष्ठेने सांभाळला आणि नंतर तालुका युवक अध्यक्षपद स्वीकारले.

२०२१ मध्ये उंबरे ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून निवडून आलेल्या गणेश खुटवड यांनी चार वर्षांत ४ कोटीहून अधिक विकासकामे पूर्ण केली. गेली नऊ वर्षे वेळू–नसरापूर गटातील गावोगावी जाऊन लोकांच्या सुखदुःखात सहभागी होत जनसंपर्क दृढ ठेवला आहे. गट रचनेतील फेरबदलांमध्ये त्यांच्या तीन हक्काच्या गावांचा दुसऱ्या गटात समावेश झाला असला तरी, “आपले कार्यक्षेत्र वेळू–नसरापूरच असून याच गटातून आपण निवडणूक लढवणार,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
मेळाव्यास मा. प्रमोद गोतारणे, कु. दुर्गा चोरघे, मा. रविंद्र बांदल, मा. मानसिंग धुमाळ, मा. संदीप नांगरे, मा. विठ्ठल शिंदे, मा. गणेश बागल, सौ. आरती धावले यांसह अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमातील उत्स्फूर्त वातावरण, घोषणाबाजी आणि उपस्थिती पाहता कार्यकर्त्यांमध्ये गणेश खुटवड यांच्या उमेदवारीबाबतचा आत्मविश्वास ठळकपणे दिसून आला. पक्षाने तिकीट दिल्यास वेळू–नसरापूर गटातून त्यांचा विजय निश्चित असल्याची चर्चा कार्यक्रमभर रंगत होती.










