प्रतिनिधी : शिवम शिळीमकर नसरापूर
नसरापूर (ता. भोर) : नसरापूर गावाशेजारी असलेल्या हातवे बुद्रुक येथे गॅस लीकमुळे लागलेल्या भीषण आगीत अंगणवाडी शिक्षिका सुनीता नंदकुमार गुरव यांचे घर पूर्णपणे जळून खाक झाले होते. या दुर्घटनेत घरातील सर्व जीवनावश्यक साहित्य जळून नष्ट झाल्याने गुरव कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे भोर तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर माऊली शिंदे यांनी सामाजिक बांधिलकी जपत आगग्रस्त कुटुंबाला तातडीची मदत केली. त्यांनी महिनाभर पुरेल असा किराणामाल तसेच अन्य आवश्यक जीवनोपयोगी वस्तू गुरव कुटुंबाला सुपूर्द केल्या.
यावेळी बोलताना ज्ञानेश्वर माऊली शिंदे म्हणाले की, “घराला आग लागून संपूर्ण नुकसान झाले आहे. अशा कठीण प्रसंगी जनतेच्या सेवेसाठी शिवसेना नेहमीच पुढे उभी राहते. आगग्रस्त कुटुंबाला आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडेही पाठपुरावा करण्यात येईल.”
या मदतकार्याच्या वेळी मंगेश राजगुरू, विजय राजगुरू, गावच्या पोलीस पाटील राजश्री जामदार, अभिषेक राजगुरू, अतुल नाकती, शुभम थिटे, अजय थिटे, ओंकार थिटे, आकाश गुरव, बाळू राजगुरू आदी उपस्थित होते. स्थानिक ग्रामस्थांनीही एकत्र येत सहकार्याची भूमिका घेतली.
आग लागल्यामुळे संपूर्ण संसार उद्ध्वस्त झालेल्या गुरव कुटुंबाला या मदतीमुळे काहीसा दिलासा मिळाला असून, सामाजिक एकोप्याचे दर्शन या प्रसंगी घडले. परिसरातील नागरिकांनी शिवसेना ठाकरे गटाच्या या मदतकार्याचे कौतुक केले आहे.
दरम्यान, अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत यासाठी नसरापूर परिसरात कायमस्वरूपी अग्निशमन दल उभारण्याची मागणीही यावेळी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.







