शिवसेना युवानेते, युवासेना पुणे जिल्हा सचिव तथा शिवभक्त रोहिदास (आबा) कोंडे यांच्या ‘शिवसेना दिनदर्शिका २०२६’ चे प्रकाशन शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख मा. श्री. प्रकाश (भाऊ) भेगडे तसेच वेळू गणातील ज्येष्ठ, मान्यवर मंडळींच्या हस्ते उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला शिवसैनिक, ग्रामस्थ, युवक वर्ग व विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती होती.
या प्रसंगी बोलताना मा. श्री. प्रकाश (भाऊ) भेगडे यांनी रोहिदास (आबा) कोंडे यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा गौरव केला. “शिवसेनेची विचारधारा केवळ राजकारणापुरती मर्यादित नसून ती समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम आबा कोंडे करत आहेत. दिनदर्शिकेच्या माध्यमातून शिवसेनेचा इतिहास, संस्कार व सामाजिक बांधिलकी नव्या पिढीपर्यंत पोहोचेल,” असे त्यांनी नमूद केले.
वेळू गणातून पंचायत समितीचे इच्छुक उमेदवार म्हणून ओळख असलेल्या रोहिदास (आबा) कोंडे यांच्या दिनदर्शिकेचे उद्घाटन हे त्यांच्या कार्याची पावती मानली जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वेळू परिसरात सामाजिक उपक्रम, शैक्षणिक मदत, आरोग्यविषयक सहाय्य, आपत्तीग्रस्तांना मदत, युवकांना रोजगार मार्गदर्शन तसेच सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला आहे. राजकीय कामासोबतच सामाजिक बांधिलकी जपत गरजू व्यक्तींना वेळोवेळी मदतीचा हात देण्याचे कार्य त्यांनी अखंड सुरू ठेवले आहे.
दिनदर्शिकेमध्ये शिवसेनेचा वैचारिक वारसा, प्रेरणादायी प्रसंग, महत्त्वाचे दिनविशेष तसेच समाजोपयोगी माहितीचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ही दिनदर्शिका केवळ दिनदर्शक न राहता शिवसेनेच्या विचारांचे दैनंदिन स्मरणपत्र ठरेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या शेवटी रोहिदास (आबा) कोंडे यांनी उपस्थितांचे आभार मानत, “वेळू भागाच्या सर्वांगीण विकासासाठी, प्रत्येक सामाजिक व राजकीय प्रश्नासाठी आपण सदैव तत्पर राहू. सामान्य माणसाचा आवाज बनून काम करत राहणे हेच माझे ध्येय आहे,” असा विश्वास व्यक्त केला.
या प्रकाशन सोहळ्यामुळे वेळू गणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचा ठरत आहे.







