अंगात खाकी वर्दी, कमरेला पक्कड, खिशाला टेस्टर आणि डोळ्यांत प्रत्येक घर उजळून निघावे ही तळमळ… ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता सदैव सेवेसाठी सज्ज असणारा वीज व्यवस्थेचा खरा आधारस्तंभ म्हणजे लाईनमन. केंद्र शासनाने ४ मार्च हा दिवस देशभरात ‘लाईनमन दिन’ म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले असून, या निमित्ताने वीज कर्मचाऱ्यांच्या अहोरात्र कष्टांना सलाम व्यक्त केला जात आहे.
आज वीज ही मानवाची चौथी मूलभूत गरज बनली आहे. एका बटणाच्या स्पर्शाने घर उजळते, उद्योगधंदे सुरू होतात, रुग्णालयांत जीव वाचतात. पण या झगमगाटामागे उभी असलेली अवाढव्य यंत्रणा जी आपल्या जीवाची बाजी लावून सांभाळते, तो खरा नायक म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण)चा लाईनमन होय.
ग्रामीण भागात वीज यंत्रणा पूर्णतः उघड्यावर असते. वादळ-वारा किंवा मुसळधार पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला की, साक्षात मृत्यूशी दोन हात करत लाईनमन पुन्हा प्रकाश आणण्यासाठी सज्ज होतो. डोंगरदऱ्या, घनदाट जंगलं आणि लांबच लांब पसरलेल्या विद्युत वाहिन्यांमधून मैलोन्मैल ‘लाईन पेट्रोलिंग’ करत तो बिघाड शोधून काढतो.
दुर्गम भागातील मोठे आव्हान
राजगड (वेल्हे) तालुक्याची भौगोलिक परिस्थिती अत्यंत कठीण आहे. पावसाचे प्रचंड प्रमाण, डोंगराळ रचना आणि दुर्गम वस्तीमुळे पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत ठेवणे हे मोठे आव्हान ठरते. भर पावसात गुडघाभर चिखलातून चालत जाऊन तांत्रिक बिघाड दुरुस्त करणे ही रोजचीच बाब असते.
“विजेची तार आणि मृत्यूची रेषा यात फारच कमी अंतर असते. क्षणभराची चूक जीवावर बेतू शकते, तरीही हा सैनिक निधड्या छातीने आपले कर्तव्य बजावत असतो,” अशी भावना व्यक्त होत आहे.
कष्टाची जाणीव हीच खरी कृतज्ञता
वीज गेल्यावर तिचे महत्त्व जाणवते; मात्र ती पुन्हा सुरळीत करण्यासाठी कोण अंधाराशी झुंज देत आहे, याचा विचार क्वचितच होतो. रात्री-बेरात्री, कडाक्याच्या थंडीत किंवा मुसळधार पावसात विद्युत खांबावर चढून काम करणारा लाईनमन समाजाला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातो.
लाईनमन दिनाच्या निमित्ताने या जिगरबाज कर्मचाऱ्यांच्या कष्टांची दखल घेऊन त्यांना मानाचा मुजरा करणे, हीच खरी कृतज्ञता ठरेल.
शेवटी इतकेच म्हणावेसे वाटते—
वेळ कोणतीही असो, तुमच्या घरात अंधार येऊ देणार नाही… कारण तुमच्या सोबत सदैव आहे, महावितरणच्या लाईनमनचा भक्कम आधार










