भिगवण पंचायत समिती गणासाठी भारतीय जनता पार्टी (इंदापूर तालुका) कडून तक्रारवाडी गावच्या माजी सरपंच प्राजक्ता वाघ यांना उमेदवारी देण्याचे संकेत मिळाल्याची माहिती राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. आगामी पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप इंदापूर तालुका नेतृत्वाकडून त्यांना उमेदवारी अर्ज भरण्याबाबत सकारात्मक संकेत देण्यात आल्याचे समजते.
प्राजक्ता वाघ या तक्रारवाडी गावच्या माजी सरपंच असून त्यांच्या कार्यकाळात गावातील विकासकामे, मूलभूत सुविधा आणि विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. सर्वसामान्यांच्या अडचणी समजून घेऊन तत्काळ उपाययोजना करण्याची कार्यपद्धती आणि थेट जनसंपर्कामुळे त्यांना गावासह संपूर्ण परिसरात चांगला प्रतिसाद मिळाल्याचे बोलले जात आहे.
त्यांचे पती सचिन वाघ हे भाजप इंदापूर तालुक्यातील सक्रिय कार्यकर्ते असून पक्षसंघटन, निवडणूक प्रचार व सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सातत्यपूर्ण सहभाग आहे. त्यामुळे तालुका पातळीवर वाघ कुटुंबाला परिचयासह विश्वासार्हता लाभली असल्याचे राजकीय जाणकार सांगतात.
सामाजिक क्षेत्रातील कामाची आवड, महिला व युवकांशी प्रभावी संवाद आणि मजबूत जनसंपर्क ही प्राजक्ता वाघ यांची ओळख मानली जाते. भाजपकडून उमेदवारीचे संकेत मिळाल्याने भिगवण पंचायत समिती गणातील राजकीय हालचालींना वेग आला असून इच्छुकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
आगामी काही दिवसांत भाजपकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भिगवण पंचायत समिती गणातील निवडणूक चित्र स्पष्ट होणार असून स्थानिक राजकारणात महत्त्वाचे बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.







