भोर – प्रतिनिधी: विलास धोंगडे
तीर्थक्षेत्र कोंढणपूरची श्रुतिका सचिन मुजुमले (पाटील) हिने डेरवण, रत्नागिरी येथे झालेल्या हॅमर थ्रो स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय स्तरासाठी निवड मिळवली आहे. कोंढणपूर गावातील पहिलीच मुलगी राष्ट्रीय पातळीवर पोहोचल्याने संपूर्ण गावात आनंदाचा जल्लोष साजरा होत आहे.
श्रुतिकाचा प्रवास अत्यंत चिकाटीचा राहिला आहे. सलग सात वर्षे अभ्यास, सराव आणि खेळ यांचा योग्य समतोल राखत तिने दहावीमध्ये 84% गुण मिळवले. तिची स्वतःची इच्छा डॉक्टर होण्याची होती; परंतु वडील सचिन मुजुमले (पाटील) यांचे स्वप्न होते की मुलीने राष्ट्रीय पातळीवर खेळाडू म्हणून गावाचा आणि कुटुंबाचा अभिमान वाढवावा. वडिलांच्या त्या स्वप्नाला प्राधान्य देत श्रुतिकाने क्रीडा क्षेत्राचा मार्ग स्वीकारला आणि आज त्याच जिद्दीच्या जोरावर तिने ते स्वप्न पूर्णत्वास नेले.
सकाळच्या सरावापासून सातत्यपूर्ण मेहनत, अपयश आले तरी न खचता पुन्हा उभे राहण्याची वृत्ती आणि “माघार नाही” हा जिद्दीचा मंत्र—यामुळे श्रुतिका राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचली. गावातील तरुणाईसाठी तिचा हा प्रवास प्रेरणेचा शाश्वत स्त्रोत ठरत आहे.
माजी सरपंच सौ. तृप्ती (ताई) नवनाथ मुजुमले (पाटील) यांनी सांगितले, “श्रुतिकाच्या यशाने संपूर्ण कोंढणपूर गावाचे नाव देशभर पोहोचले आहे. आई तुकाई मातेचा आशिर्वाद तिच्यावर सदैव राहो.”
यावेळी थोरले पाटील उद्योग समूह, मित्र परिवार, तसेच जय भवानी तरुण मंडळ, कोंढणपूर यांनी श्रुतिकाचे मनःपूर्वक अभिनंदन करत तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. “ही आमच्या गावाची शान आहे. श्रुतिका अजून मोठे यश मिळवेल,” असे मंडळाच्या सदस्यांनी सांगितले.
श्रुतिकाची ही निवड कोंढणपूरसाठी ऐतिहासिक ठरली आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण शिवगंगा खोऱ्यात उत्साहाचे वातावरण असून, आगामी राष्ट्रीय स्पर्धेतही ती आणखी चमकदार कामगिरी करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.










