पुरंदर प्रतिनिधी : निखिल जगताप
पुरंदर तालुक्यातील पिंपळे गावातील उच्चशिक्षित तरुण महेश गुलाब पोमन यांनी आपल्या सासवड आणि पिंपळे येथील शेतीत सहा प्रकारच्या बेरी उत्पादनाचा अत्यंत यशस्वी प्रयोग करून ग्रामीण भागातील शेतीला आधुनिकतेचा नवा आयाम दिला आहे. रासबेरी, ब्लॅकबेरी, स्ट्रॉबेरी, मलबेरी, गोजबेरी आणि ब्लूबेरी — या सहा बेरी प्रजातींची लागवड सुमारे तीन एकर क्षेत्रावर करून त्यांनी गुणवत्तापूर्ण व नफ्याची शेती साकारली आहे.
परदेशी पीक स्थानिक मातीत फुलवले

बेरी पिकांचे उत्पादन प्रामुख्याने थंड हवामान असलेल्या पेरू, ऑस्ट्रेलिया, अमेरिकेसारख्या देशांत घेतले जाते. परंतु महाराष्ट्रातील हवामानातही या पिकांची यशस्वी लागवड करता येते, हे पोमन यांनी आपल्या प्रयोगातून दाखवून दिले आहे. स्थानिक वातावरणाशी सुसंगत जातींची निवड आणि पॉलिहाऊससारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी परदेशातल्या शेती पद्धती भारतीय शेतकऱ्यांसाठी सुलभ केल्या आहेत.
शिक्षणातून शेतीकडे प्रवास
बी.एस्सी. पदवीधर असलेले महेश पोमन हे २०१९ मधील कोरोना संकटानंतर इंजिनिअरिंग वर्कशॉपचा व्यवसाय बंद करून पूर्णवेळ शेतीकडे वळाले. “शेतीत प्रयोग करायचा आणि वेगळं काहीतरी करायचं” या जिद्दीने त्यांनी ‘पोमन अॅग्रो फूड्स’ या कंपनीची स्थापना केली. स्वतः मार्केटिंग करून त्यांनी पुणे, मुंबई, बंगळुरू, हैद्राबाद, दिल्ली अशा महानगरांतील ग्राहकांपर्यंत थेट ताजी बेरी उत्पादने पोहोचवण्याची साखळी उभी केली आहे.
रासबेरी लागवडीचा आदर्श प्रयोग
सासवड (ता. पुरंदर) येथील दहा गुंठे पॉलिहाऊस भाडेतत्त्वावर घेऊन १० जुलै २०२५ रोजी रासबेरीच्या तीन व्हरायटी – लाल राजा, लाल राणी आणि लाल प्रधान – यांची टिश्यू कल्चर रोपांद्वारे लागवड करण्यात आली. भारतातील हवामानास अनुकूल आणि रोगप्रतिकारक्षम अशी ही रोपे निवडली गेली. केवळ तीन महिन्यांत पहिली काढणी (हार्व्हेस्टिंग) सुरू झाली असून, आतापर्यंत १० ते १२ वेळा फळांची काढणी झाली आहे. सध्या बाजारात रासबेरीला प्रति किलो २,००० ते ४,५०० रुपये इतका दर मिळत आहे.

आधुनिकतेचा अंगीकार
पोमन यांच्या शेतात सध्या रासबेरीची ७०० रोपे, इंडियन ब्लॅकबेरीची १० रोपे, स्ट्रॉबेरीच्या विंटर डाऊन व स्वीट सेंसेशन जातींच्या २,००० रोपा, इंडियन मलबेरीच्या ३,००० रोपा, इंडियन गोजबेरीच्या १,००० रोपा तसेच ब्लूबेरीच्या ‘बेरी लँड’ जातीच्या २०० रोपा अशी एकूण सहा बेरींची लागवड आहे.
महेश पोमन म्हणाले –
> “कमी शेतीत जास्त उत्पादन आणि आधुनिक पद्धतीने शेती केल्यास अधिक नफा मिळविता येतो. पारंपरिक शेतीसोबतच आधुनिक शेतीला प्राधान्य दिल्यास आपले उत्पन्न वाढवणे शक्य आहे. स्थानिकच नव्हे तर जागतिक बाजारपेठेतही या पिकांना मोठी मागणी आहे. प्रत्येक शेतकऱ्याने नवनवीन प्रयोग करून स्वतःचा विकास साधावा.”

पुरंदरमधील महेश पोमन यांनी केलेला हा आधुनिक शेतीचा प्रयोग आज परिसरातील तरुण शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, ‘शेती म्हणजे तोटा नव्हे, तर तंत्रज्ञानाशी नाते जोडले की शेती हा सर्वाधिक नफा देणारा व्यवसाय होऊ शकतो’ हे त्यांचे उदाहरण अधोरेखित करते.










