प्रतिनिधी – विलास धोंगडे, नसरापूर
भोर तालुक्यातील कुरंगवडी येथील जनतेचा विश्वास संपादन करणारे आणि गेली तीन दशके राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले श्री. संदिप (काका) नारायण शिळीमकर यांनी पंचायत समिती नसरापूर गणातून निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे.
शिळीमकर हे मा. सदस्य व उपसरपंच ग्रामपंचायत कुरंगवडी, विश्वस्त – श्री म्हातोबा देवस्थान ट्रस्ट, तसेच अध्यक्ष – ग्रामविकास प्रतिष्ठान, कुरंगवडी या नात्याने सामाजिक कार्यात सातत्याने योगदान देत आहेत.
राजकारणातील त्यांचा प्रवास घराण्याच्या लोकसेवेच्या वारशातूनच सुरू झाला. त्यांच्या काकू सौ. शालिनीताई जगन्नाथ शिळीमकर या सन १९८७ ते १९९२ या काळात कुरंगवडीच्या प्रथम महिला सरपंच होत्या आणि त्यानंतर १९९२ ते १९९७ या काळात पं.स. सदस्य भोर म्हणून कार्यरत होत्या. त्याचबरोबर त्यांनी राजगड सहकारी साखर कारखाना, निगडे येथे संचालिका म्हणून यशस्वी कार्यकाळ पूर्ण केला होता.
त्या प्रेरणेने संदिप शिळीमकर यांनीही जनतेच्या प्रश्नांसाठी आपले आयुष्य वाहिले. १९९७ ते २००३ दरम्यान त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात भोर तालुका उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले. आमदार अनंतराव थोपटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अनेक विकासकामांचा पाठपुरावा करून ती पूर्णत्वास नेली.
आजही ते ग्रामदैवत श्री म्हातोबा देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त सदस्य म्हणून अखंड सेवा करत आहेत. मागील १५ ते २० वर्षे ते पंढरपूर वारीच्या आयोजनात सक्रिय सहभागी असून वारकरी भक्तांना अखंड सेवा देत आहेत.
ग्रामपंचायत सदस्य आणि उपसरपंच म्हणून त्यांनी कुरंगवडी गावात अनेक प्रलंबित कामे मार्गी लावली. त्यांच्या पाठपुराव्यामुळे गावातील मूलभूत सोयीसुविधा, रस्ते, पाणीपुरवठा आणि ग्रामविकासाची कामे पूर्ण झाली.
संदिप शिळीमकर म्हणाले, “आमचा भाग डोंगराळ आणि दुर्गम असल्याने विकासकामांना गती मिळत नाही. आपल्या पंचक्रोशीतील कुरंगवडी, कोळवडी, जांभळी, पारवडी, सोनवडी, सांगवी, विरवाडी, हातवे, तांभाड या गावांच्या विकासासाठी आणि पर्यटन, शेती, शिक्षण व लघुउद्योग क्षेत्रात नवसंजीवनी आणण्यासाठी मी पंचायत समिती नसरापूर गणातून उमेदवारी मागत आहे.”
गेल्या तीन दशकांपासून कोणत्याही पदाची अपेक्षा न बाळगता लोकसेवा करणाऱ्या शिळीमकर यांचा उमेदवारीचा निर्णय हा जनतेत चर्चेचा विषय ठरला असून, नसरापूर गणात त्यांच्या उमेदवारीला स्थानिक कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.







