खेड शिवापुर (ता. हवेली) – विलास धोंगडे
पुणे-सातारा महामार्गावरील खेड शिवापुर गावाजवळ कोंढणपूर पुलाजवळ एका तरुणावर चार अनोळखी इसमांनी रिक्षा आडवी लावून चाकूचा धाक दाखवत जबरी चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
फिर्यादी इंद्रप्रकाश भगवंता सौयाम (वय 27, रा. खेड शिवापुर, मूळगाव – धिरवंनमला, ता. सहपुरा, जि. डिंढोरी, मध्यप्रदेश) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 5 नोव्हेंबर 2025 रोजी मध्यरात्री सुमारे साडेबारा वाजण्याच्या सुमारास ते कामावरून पायी घरी जात असताना काळ्या रंगाच्या रिक्षामधून आलेल्या चार अनोळखी इसमांनी रिक्षा आडवी लावून त्यांना थांबविले.
या इसमांनी शिवीगाळ व दमदाटी करत हातातील चाकूचा धाक दाखवून फिर्यादीचा इनफिनिक्स कंपनीचा सिल्वर रंगाचा मोबाईल फोन (किंमत सुमारे 10,000 रुपये) तसेच रोख 12,700 रुपये जबरीने हिसकावून घेतले. या दरम्यान त्यांनी फिर्यादीला हाताने मारहाण केली आणि त्यांचा शर्ट फाडून टाकला.
एकूण 22,700 रुपयांचा माल चोरीला गेला असून, या घटनेनंतर आरोपी इसम रिक्षासह पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून सपोनी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. गुन्हा पोहवा कोल्हे (बकल नं. 1860) यांनी नोंदवला आहे.
या जबरी चोरीच्या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रात्री उशिरा एकटे प्रवास करणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.










