नसरापूर प्रतिनिधी विलास धोंगडे
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या झाल्याच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ आणि संतापाची भावना तीव्र झाली आहे. या अमानुष कृतीविरोधात नसरापूर (ता. भोर) येथे शनिवारी (दि. २२) रिटेल व्यापारी संघटना व ग्रामस्थ यांच्या पुढाकाराने भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात संताप व्यक्त करत नागरिकांनी आरोपीला कठोरात कठोर—आणि विलंब न करता—फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.
नसरापूरमधील श्री भैरवनाथ मंदिर, मेनआळी येथून सकाळी मोर्चास प्रारंभ झाला. मुख्य रस्त्याने पुढे जात मोर्चा स्वप्नलोक गेट येथे एकवटला. घोषणाबाजी, संताप, वेदना आणि न्यायाची मागणी अशा मिश्र वातावरणात मोर्चात सहभागी नागरिकांनी चिमुकली यज्ञासाठी न्याय मिळवण्याचा निर्धार स्पष्ट केला. रिटेल व्यापारी संघटनेच्या समन्वयामुळे शेकडो नागरिक एकत्र आले होते. महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत या कृत्याविरुद्ध परखड आवाज उठवला.
मोर्चाची बांधणी करण्यासाठी रिटेल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजिंक्य हाडके, उपाध्यक्ष अमोल काजळे, प्रवीण ठोंबरे, संतोष सणस, प्रसन्न गयावळ आणि माऊली मोझे यांनी मोठे योगदान दिले. संपूर्ण नियोजन, मार्गरचना, लोकांचे आवाहन, तसेच मोर्चा शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्याची जबाबदारी त्यांनी यशस्वीरीत्या निभावली. व्यापारी, युवक, महिलांच्या संघटना आणि ग्रामस्थ यांचे जाळे उभे करून त्यांनी एकत्रितपणे मोर्चा भव्य स्वरूपात पार पाडला.
घटनेमुळे निर्माण झालेली अस्वस्थता आणि रोष यांचे प्रतिबिंब नागरिकांच्या मनोगतांमधून स्पष्टपणे जाणवत होते. सभास्थळी बोलताना अनिल गयावळ, भरत शेटे, सरपंच उषा कदम, अजिंक्य हाडके, ज्योती चव्हाण, अंजली जंगम आणि चाँदभाभी शेख यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. त्यांनी या घटनेला मानवतेला काळिमा फासणारी, मन हेलावून टाकणारी आणि समाजासाठी गंभीर चेतावणी देणारी घटना म्हटले. आरोपी विजय खैरनार याला तातडीने फाशीची शिक्षा व्हावी, जलदगतीने आरोपपत्र दाखल होऊन फास्ट-ट्रॅक न्यायालयातून सुनावणी व्हावी, अशी एकमुखी मागणी त्यांनी व्यक्त केली.
महिला वर्गाने विशेषत: संतापाची भूमिका मांडली. “आपली मुले सुरक्षित नाहीत, अशा नराधमांसाठी कायद्यात कडक बदल व्हावेत,” अशी मागणी करत त्यांनी जनआक्रोशाची व्याप्ती अधिक तीव्र केली. मोर्चातील अनेक महिलांच्या डोळ्यात अश्रू होते, तर अनेकांनी घोषणांमधून चिमुकलीला न्याय मिळवण्यासाठी सातत्याने आवाज उठवत राहण्याची प्रतिज्ञा केली.
नसरापूर व परिसरातील नागरिकांनी पोलिस आणि प्रशासनावरही लवकरात लवकर कारवाई करण्याचा दबाव टाकला. “अशा अमानुष घटनांना जर आपण कठोर प्रतिसाद दिला नाही, तर भविष्यातील पिढीला सुरक्षित वातावरण देता येणार नाही,” असे अनेकांचे म्हणणे होते. मोर्च्याच्या माध्यमातून नसरापूरकरांनी दाखवलेली एकजूट ही समाजातील बालसुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणारी ठरली.
लहूनाना शेलार, सरपंच उषा कदम, उपसरपंच इरफान मुलाणी, गणेश दळवी, नामदेव चव्हाण, ज्ञानेश्वर झोरे, सुधीर वाल्हेकर, रमेश कदम, प्रदीप राशीनकर, युवराज वाल्हेकर, संतोष सणस, अनिल ननावरे, सचिन बांदल, सागर पांगारकर, प्रवीण धावले, रेखा राशीनकर, वैशाली झोरे, कविता हाडके, साहिल कांबळे, अजहर तांबोळी आणि इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.










