आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

भोरमध्ये श्रेयवादावरून राजकीय रणधुमाळी; थोपटे–मांडेकर वादाने घेतला तीव्र स्वरूप


भोर तालुक्यात सध्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले असून माजी आमदार संग्राम थोपटे आणि विद्यमान आमदार शंकर मांडेकर यांच्यातील संघर्ष उघडपणे समोर आला आहे. व्यापारी संकुलाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पेटलेला हा वाद आता अधिकच चिघळत चालला आहे.

 

भोरमधील व्यापारी संकुलाच्या उद्घाटनावरून दोन्ही नेत्यांमध्ये श्रेयवादाची लढाई रंगली. एकाच कामासाठी दोन्ही बाजूंनी स्वतंत्र कार्यक्रम घेण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. या कार्यक्रमात आमदार शंकर मांडेकर यांनी संग्राम थोपटे यांच्यावर जोरदार टीका करत थेट आव्हान दिले.

 

“सहा वर्षे प्रलंबित असलेले काम आम्ही निधी देऊन पूर्ण केले. अनेक वर्षे सत्तेत असूनही विरोधकांनी काहीच केले नाही,” असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. “मी सरळ आहे, पण अंगावर आलात तर सोडणार नाही. दम असेल तर वेळ आणि ठिकाण सांगा,” असे आव्हान देत त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. तसेच “कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.

 

मांडेकर यांच्या या वक्तव्यावर भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत पत्रकार परिषद घेतली. जिल्हा परिषद सदस्य पोपटराव सुके, पंचायत समिती सदस्य रोहन बाठे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी मांडेकर यांच्या वक्तव्याचा निषेध करत याबाबत वरिष्ठ स्तरावर तक्रार केल्याचे सांगितले.

 

यावेळी भाजप नेत्यांनी सांगितले की, संग्राम थोपटे यांनी त्यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर निधी आणून भोर तालुक्यात विकासकामे केली आहेत. शिक्षण क्षेत्रातही त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. मांडेकर यांचे आरोप तथ्यहीन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

मांडेकर यांच्या भाषाशैलीवरही टीका करत भाजप नेत्यांनी म्हटले की, “त्यांची भाषा ही दादागिरीची असून भाजपची संस्कृती तशी नाही. आम्ही संयम बाळगतो, मात्र गरज पडल्यास योग्य उत्तर दिले जाईल.” त्याचवेळी “या मातीत अनेकांना शिंगावर घेण्याची परंपरा आहे,” असा अप्रत्यक्ष इशारा देण्यात आला.

 

दरम्यान, भोरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बळ वाढत असल्यामुळे राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. राष्ट्रवादीकडून विकासकामांना गती मिळत असल्याचा दावा केला जात असून त्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा आहे. काही ठिकाणी भाजपकडून सुरू असलेल्या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न होत असल्याचीही टीका होत आहे.

 

तसेच, “गेल्या अनेक वर्षांत विकास झाला नाही; आता राष्ट्रवादी काम करू लागल्याने सत्ता गमावण्याची भीती निर्माण झाली आहे,” अशीही चर्चा रंगली आहे. या सर्व घडामोडींमुळे भोर तालुक्यातील राजकारण आणखी तापण्याची चिन्हे दिसत असून आगामी काळात संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


  • 👍
102
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!