आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

कोल्हापूरच्या प्रमुख मार्गांवर देशी वृक्षलागवडीचा मार्ग मोकळा! निसर्गमित्रांच्या निवेदनानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचा सकारात्मक निर्णय


कोल्हापूर (प्रतिनिधी – अभिजीत वाघमोडे):

गगनबावडा, शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्गांवर होणाऱ्या वृक्षलागवडीमध्ये विदेशी झाडांना प्राधान्य दिले जात असल्याची गंभीर बाब समोर आल्यानंतर आज निसर्गप्रेमी कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता श्री. तुषार बुरुड यांना निवेदन देत गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली. यानंतर विभागाने देशी झाडांना प्राधान्य देण्यासाठी SOP मध्ये योग्य ते बदल करण्याचे आश्वासन दिल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

अलीकडेच सार्वजनिक बांधकाम विभागाने कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख जिल्हा मार्गांच्या दुतर्फा वृक्षलागवड, देखभाल आणि संवर्धनासाठी तब्बल सहा कोटींची निविदा (जा. क्र. लेखा/निविदा/३०४५/२०२५) १४ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर केली. परंतु या निविदेत मागील वर्षीप्रमाणे गुलमोहर, टेब्युबिया, रेनट्री, कोनोकोर्पस, टिकोमा, कॅशिया यांसारख्या विदेशी प्रजातींचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचे आढळून आले.

 

परंतु अशा विदेशी झाडांमुळे स्थानिक पर्यावरण, जैवविविधता, पक्षी-फुलपाखरांच्या अधिवासावर दुष्परिणाम होऊ शकतो, तसेच आगामी काळात संपूर्ण परिघाच्या परिसंस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतात, असा मुद्दा निसर्गमित्रांनी अधिक्षक अभियंत्यांसमोर मांडला.

 

त्याऐवजी जांभूळ, कुसुंब, कडुलिंब, कदंब यांसारखी स्थानिक, हवामानाला अनुरूप, सदाहरित, सावली देणारी, सुगंधी, औषधी व पर्यावरणपूरक झाडे रस्त्यांच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात लावण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. या देशी प्रजाती स्थानिक जैवविविधतेला हातभार लावतात तसेच परिसराची नैसर्गिक सौंदर्यपूर्णता वाढवतात, हेही अधोरेखित करण्यात आले.

निवेदनादरम्यान या झाडांची उपयुक्तता, परागीभवनासाठी महत्त्व, फुलांचे रंग, सुवास, स्थानिक पक्षी आणि फुलपाखरांना आवश्यक असलेला अधिवास याबद्दल सविस्तर चर्चा झाली. यानंतर अधिक्षक अभियंता तुषार बुरुड यांनी –

“या आठवड्यात जाहीर केलेल्या निविदेसह भविष्यातील सर्व वृक्षारोपणात देशी प्रजातींनाच प्राधान्य दिले जाईल. विभागाच्या SOP मध्ये आवश्यक ते बदल केले जातील,” असे आश्वासन दिले.

 

याचबरोबर निसर्गमित्रांच्या वतीने संबंधित मार्गांसाठी उपयुक्त अशा देशी झाडांची अभ्यासपूर्ण यादी सार्वजनिक बांधकाम विभागाला सादर करण्यात आली. यामुळे भविष्यात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात केवळ पर्यावरणस्नेही, देशी आणि जैवविविधतेस पूरक अशा वृक्षलागवडीचा मार्ग मोकळा होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

 

या भेटीप्रसंगी निसर्गमित्र सुहास वायंगणकर, निर्मला पाटील बेदरे, अभिजीत वाघमोडे, परितोष उरकुडे, दिग्विजय शिर्के, अक्षय खोंद्रे, अवधूत सुतार उपस्थित होते.

 

पर्यावरणसंवर्धनासाठी एक सकारात्मक पाऊल — कोल्हापूरचा मार्ग अधिक हिरवा होणार!


  • 👍
109
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!