भोर : प्रतिनिधी तबरेज खान
भोर नगरपरिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी रविवारी (दि. २१) कान्होजी जेधे शासकीय प्रशिक्षण संस्था, भोर येथे पार पडणार असून पाच फेऱ्यांत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया सुमारे एका तासात पूर्ण होऊन निकाल जाहीर होण्याची शक्यता असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी गजानन शिंदे यांनी दिली.
रविवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर चार कर्मचारी नेमण्यात आले असून उमेदवारांचे प्रतिनिधी म्हणून प्रत्येकी दोन जण उपस्थित राहणार आहेत. शांतता व पारदर्शकता राखण्यासाठी आवश्यक त्या सर्व प्रशासकीय उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
मतमोजणीची प्रक्रिया पाच फेऱ्यांत पार पडणार आहे. पहिल्या फेरीत प्रभाग क्रमांक एक ते पाच मधील अ क्रमांकाच्या मतांची मोजणी होणार आहे. दुसऱ्या फेरीत प्रभाग क्रमांक एक ते पाच मधील ब क्रमांकाच्या मतांची मोजणी करण्यात येईल. तिसऱ्या फेरीत प्रभाग क्रमांक सहा, सात, आठ व दहा मधील अ क्रमांकाची तसेच प्रभाग क्रमांक चार मधील क क्रमांकाची मतमोजणी होणार आहे.
चौथ्या फेरीत प्रभाग क्रमांक सहा, सात, आठ व दहा मधील ब क्रमांकाची तसेच प्रभाग क्रमांक नऊ मधील अ क्रमांकाची मतमोजणी होईल. पाचव्या आणि अंतिम फेरीत प्रभाग क्रमांक आठ मधील क आणि प्रभाग क्रमांक नऊ मधील ब क्रमांकाची मतमोजणी पूर्ण करण्यात येणार आहे.
सर्व पाचही फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर नगरपरिषद सदस्यांचे तसेच नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे. निकालाकडे उमेदवारांसह नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.










