आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

ग्रामीण बालकवींना नवे क्षितिज; देगावमध्ये विद्यार्थ्यांचे कवी संमेलन उत्साहात


साताऱ्यात सुरू असलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले जयंती व बालक दिनाचे औचित्य साधत देगाव (ता. भोर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे कवी संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. काव्ययोग काव्य संस्था, पुणे आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, देगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमाने ग्रामीण भागातील बालकवींना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

 

या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी **किरणजी केंद्रे (कार्यकारी संपादक, बालभारती – पुणे) होते. अध्यक्षीय मनोगतात त्यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांच्या लेखनातील प्रामाणिक भावविश्व, कल्पकता आणि निरीक्षणशक्तीचे विशेष कौतुक केले. अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला योग्य दिशा मिळते, तसेच निवडक ग्रामीण कविता ‘किशोर’ मासिकात प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

हे संमेलन निसर्ग कवी लक्ष्मण शिंदे यांच्या सहकार्यातून संपन्न झाले. उद्घाटनप्रसंगी त्यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांना कविता लेखन व सादरीकरणाच्या अधिकाधिक संधी मिळाव्यात, यासाठी अशा उपक्रमांचे सातत्य अत्यावश्यक असल्याचे मत मांडले. कार्यक्रमाला सौ. वसुधा नाईक (बालसाहित्यिक व कवयित्री), ज्येष्ठ साहित्यिक श्री. श्रीपाद कोंडे, काव्ययोग काव्य संस्थेचे अध्यक्ष योगेश हरणे, कामथडी केंद्रप्रमुख साधना गायकवाड, मुख्याध्यापक मधुकर यादव, शिक्षकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

या कवी संमेलनात २४ विद्यार्थ्यांनी निसर्ग, शाळा, आई-वडील, समाज आणि स्वप्नांची दुनिया अशा विविध विषयांवर आशयपूर्ण कविता सादर केल्या. उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना सन्मानपत्र, पुस्तके व पदके देऊन गौरविण्यात आले, तर सर्व सहभागी बालकवींनाही प्रमाणपत्र व पदक देण्यात आले.

 

भोर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या कवी संमेलनामुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. व्यासपीठावर कविता सादर करताना मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेला आत्मविश्वास आणि आनंद उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेला.

 

ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाद कोंडे यांनी भविष्यात तालुकास्तरीय बाल कवी संमेलन घेण्याची सूचना केली, तर सौ. वसुधा नाईक यांनी बालकवितांतील भावविश्व प्रभावीपणे उलगडून सांगितले. प्रास्ताविकात योगेश हरणे यांनी आगामी काळात जिल्हास्तरीय बाल कवी संमेलन आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला.

 

या उपक्रमात शाळेतील ३० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. सिद्धी बिडकर, द्वितीय क्रमांक कु. अनुष्का नांदे आणि तृतीय क्रमांक कु. उत्कर्ष जाधव यांनी पटकावला. उत्तेजनार्थ वेदिका सावंत, स्वरा यादव व श्रीराम पवार यांनाही प्रशस्तीपत्रक व पदक देऊन गौरविण्यात आले.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विठ्ठल पवार यांनी प्रभावीपणे केले. संपूर्ण नियोजन श्री. महेंद्र सावंत यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिक्षक श्री. योगेश पवार यांनी मानले. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या साहित्यिक अभिव्यक्तीला नवी दिशा देणारा हा उपक्रम दैनिकासाठी निश्चितच उल्लेखनीय ठरला.


  • 👍
107
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!