आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

भाटघर जलाशय परिसरातील जि.प. शाळांना नवे बेंच सामाजिक सहकार्यामुळे डोंगरदऱ्यातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू


भोर प्रतिनिधी : तबरेज खान 

 

भोर तालुक्याच्या भाटघर जलाशयाच्या किनारी वसलेल्या मौजे पसुरे येथील पुणे जिल्हा परिषदेच्या सर्व सहा शाळांना नव्या बेंचचे वाटप करण्यात आले. दुर्गम डोंगरदऱ्यात वसलेल्या या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम अत्यंत दिलासादायक ठरला आहे. सामाजिक कार्यकर्त्या विशाखा वैद्य यांच्या माध्यमातून, युवा उद्योजक संतोष धुमाळ यांच्या सहकार्यातून तसेच पसुरे गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोज धुमाळ यांच्या विशेष प्रयत्नातून हा उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आला. याच वेळी धनगरवस्तीवरील शाळेसाठी फळ्याचीही भेट देण्यात आली.

 

या उपक्रमामुळे अनेक वर्षांपासून अपुऱ्या साधनसुविधांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथमच नवे, कोरे बेंच मिळाले. शाळेच्या वर्गात प्रवेश करताच चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान आणि आनंदाचे हसू उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. ग्रामीण आणि दुर्गम भागातील शाळांसाठी अशा मूलभूत सुविधा उपलब्ध होणे ही खरी प्रेरणादायी बाब असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

 

बेंच वाटप कार्यक्रमास युवा उद्योजक संतोष धुमाळ, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोज धुमाळ, सरपंच प्रवीण धुमाळ, उपसरपंच आनंद सणस, विकास सोसायटीचे माजी संचालक विजय धुमाळ, दत्तात्रेय धुमाळ, विशाल धुमाळ यांच्यासह सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत सामाजिक सहभागातून शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडू शकतो, असा विश्वास व्यक्त केला.

 

कार्यक्रमावेळी बोलताना तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोज धुमाळ यांनी ग्रामीण भागातील शाळांना पुढील काळात आधुनिक शिक्षणाच्या दृष्टीने अधिक मूलभूत व पायाभूत भौतिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. शिक्षण हीच खरी शाश्वत गुंतवणूक असून समाजातील प्रत्येक घटकाने अशा उपक्रमात पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

 

या उपक्रमामुळे पसुरे परिसरातील जि.प. शाळांना नवी ऊर्जा मिळाली असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणप्रवासाला बळ मिळाल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.


  • 👍
109
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!