नसरापूर प्रतिनिधी – विलास धोंगडे
नसरापूर गणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद दिवसेंदिवस अधिक बळकट होत आहे. याच पार्श्वभूमीवर, भोर-राजगड-मुळशी मतदारसंघाचे आमदार शंकर भाऊ मांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या भव्य कार्यकर्ता मेळाव्यात, शंभरहून अधिक भारतीय जनता पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे नसरापूर गणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रभाव आणि जनाधार दोन्हीही अधिक दृढ झाल्याचे स्पष्टपणे जाणवले.
हा मेळावा भोर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल (बंटी) कोंडे यांच्या संयोजनातून पार पडला. या प्रसंगी बोलताना आमदार शंकर भाऊ मांडेकर म्हणाले,

> “जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आजही जनतेचा एकमेव पर्याय आहे. पक्षाच्या विचारधारेवर आणि नेतृत्वावर जनतेचा प्रगाढ विश्वास आहे. जनतेच्या अपेक्षांची पूर्तता आणि विकासात्मक परिवर्तन हेच आमचे ध्येय आहे.”
कार्यक्रमास भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संतोष घोरपडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष भालचंद्र (भाऊ) जगताप, नेते चंद्रकांत बाठे, युवा नेते विक्रम खुटवड, गणेश निगडे, ज्ञानेश्वर (माऊली) पांगारे, अमोल पांगारे, राजेंद्र सोनवणे, मोहन इंदलकर, राजेंद्र खोपडे, नसरापूर सरपंच सौ. उषा कदम, संदीप कदम, मेघा लष्कर, सागर राशीनकर, प्रशांत पडवळ, तांभाड उपसरपंच सचिन सोंडकर, भोलावडे सरपंच प्रवीण जगदाळे, नामदेव चव्हाण, निलेश कोंढाळकर, प्रदीप यादव, दीपक गरुड, चेतन कोंडे, बाळासाहेब चोरघे, रमेश पवार आदींसह पक्षाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
नसरापूर गणाचे इच्छुक उमेदवार विशाल (बंटी) कोंडे म्हणाले,

> “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून आम्ही सामाजिक उपक्रमांद्वारे आणि पक्षाच्या विचारधारेच्या प्रसाराद्वारे नसरापूर गणातील प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पोहोचत आहोत. येणाऱ्या काळात शेतकरी, कामगार, तरुण आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत.”
कार्यक्रमात माऊली पांगारे, अमोल पांगारे, चंद्रकांत बाठे आणि संतोष घोरपडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मेळाव्याचे प्रास्ताविक विशाल बंटी कोंडे यांनी केले, तर प्रभावी सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक विठ्ठल पवार सर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी नसरापूर सरपंच सौ. उषा कदम यांनी उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले.
या भव्य मेळाव्यामुळे नसरापूर गणातील राजकीय समीकरणांमध्ये बदलाची नांदी झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला जनाधार पुन्हा एकदा प्रभावीपणे सिद्ध केल्याचे चित्र दिसून आले.










