प्रतिनिधी विलास धोंगडे नसरापूर
नसरापूर (ता. भोर, जि. पुणे) – अखिल नसरापूर गाव क्रिकेट क्लबतर्फे आयोजित नसरापूर प्रीमियर लीग भव्य नाईट सामने २०२५ या सहाव्या पर्वाची गावात मोठ्या जल्लोषात सांगता झाली. गावातील तरुणाई, कुटुंबीय, क्रीडाप्रेमी आणि मान्यवर यांच्या मोठ्या उपस्थितीत रंगलेले सामने पाहण्यासाठी गावठाण गर्दीने फुलून गेले होते. अनेक वर्षांची परंपरा असलेली ही लीग आता नसरापूरच्या क्रीडा संस्कृतीचे प्रतीक ठरली आहे. प्रकाशझोतात खेळले जाणारे रात्रीचे सामने, खेळाडूंची जिगर, प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि मैदानावरील वातावरणाने स्पर्धेला उत्सवाचे रूप दिले.
या पर्वातील मानाचा करंडक मिळवण्यासाठी संघांमध्ये चुरस पाहायला मिळाली.
प्रथम क्रमांक भैरवनाथ स्ट्रायकर्स संघाने पटकावला. पै. धनेश (दादा) डिंबळे (पृथ्वीज बँक्वेट हॉल) यांच्या सौजन्याने विजेत्यांना रोख २१,००० रुपये प्रदान करण्यात आले.
व्दितीय क्रमांक जय भवानी योद्धा संघाच्या नावे नोंदवला गेला. श्री. सचिन (आण्णा) बांदल (प्रोप्रा. राजतोरण मिल्स हाऊस) आणि श्री. अनिल ननावरे (सरपंच, कुरंगवडी) यांच्या सौजन्याने संघाला १५,००० रुपये प्रदान करण्यात आले.
तृतीय क्रमांक राजमुद्रा वॉरियर्स संघाने मिळवला असून श्री. प्रविणशेठ धावले (शिवसेना युवा नेते) यांच्या हस्ते ११,००० रुपये देण्यात आले.

सर्व विजेत्या संघांना चषकाचे वितरण कै. सुभाष निवृत्ती कदम यांच्या स्मरणार्थ करण्यात आले असून या उपक्रमासाठी श्री. दत्तात्रय (पप्पुशेठ) कदम, करंट फॅन्स क्लब नसरापूर यांचे सहकार्य लाभले. स्पर्धेचे थेट प्रक्षेपण (STC Live) सौजन्याने श्री. अमोलशेठ पांगारे, मा. उपसभापती पंचायत समिती भोर यांनी उपलब्ध करून दिले.
स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही गौरविण्यात आले. उत्कृष्ट फलंदाज म्हणून विवेक विर व देव फुलारी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून अशिष अंबुरे, सार्थक खादगे व हर्ष परदेशी, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून मोन्या खेडकर व वरद जोशी तर उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून अवधुत धायगुडे यांनी चमकदार कामगिरीची नोंद केली.
नसरापूर प्रीमियर लीगचे आणखी एक आकर्षण म्हणजे संघांची रचना व संयोजन. संघमालक आपापल्या रणनीतीनुसार खेळाडूंची निवड करतात आणि प्रत्येक खेळाडूला संघाकडून नवी जर्सी व टी-शर्ट उपलब्ध करून दिले जातात. त्यामुळे संपूर्ण स्पर्धेला व्यावसायिक, शिस्तबद्ध आणि आकर्षक स्वरूप प्राप्त होते. गावातील तरुण वर्ग दिवसभराच्या श्रमांनंतर संध्याकाळी मैदानावर एकत्र येतो आणि खेळातून उमटणारा उत्साह, आनंद आणि एकोपा संपूर्ण गावाला अनुभवायला मिळतो.
या स्पर्धेमुळे स्थानिक तरुणांना आपली कला दाखवण्याची संधी मिळते, नवीन खेळाडूंना व्यासपीठ मिळते आणि गावातील क्रीडा परंपरा अधिक भक्कम होत जाते. कुटुंबीय, ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक आणि मित्रपरिवार यांच्या उपस्थितीने स्पर्धेला क्रीडा महोत्सवाचे रूप मिळाले.
या वर्षीच्या स्पर्धेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आयोजकांनी पुढील वर्षी नसरापूर प्रीमियर लीग अधिक भव्य करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. नसरापूर गावाच्या क्रीडा क्षेत्रातील ही उज्ज्वल परंपरा पुढील काळात आणखी बहरत राहील, असा विश्वास व्यक्त होत आहे.










