भोर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज तालुक्यात महत्त्वाची राजकीय घडामोड पाहायला मिळाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नसरापूर परिसरातील शिवसैनिक आदित्य बोरगे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीसह शेकडो समर्थकांसोबत भक्कम शक्तिप्रदर्शन करत सभास्थळी दमदार उपस्थिती लावली.

विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजून स्टेजवर पोहोचले नव्हते, तरीही बोरगे यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने सभास्थळी दाखल होत वातावरण उत्साहपूर्ण केले. कार्यकर्त्यांनी रस्त्यांवर आणि सभेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात एकत्र येत आपली ताकद दाखवली.

नसरापूर आणि भोर परिसरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी बोरगे यांच्यासोबत उपस्थिती दर्शवत भाजप सभेला राजकीय वजन मिळवून दिले. त्यांच्या या आगमनामुळे सभास्थळावर एक वेगळाच राजकीय माहोल निर्माण झाला.
भाजप सूत्रांच्या माहितीनुसार, आदित्य बोरगे यांचा अधिकृत पक्ष प्रवेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लवकरच होणार असल्याची दाट चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे नसरापूर–भोर क्षेत्रातील आगामी समीकरणे आणखी रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.










